ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असतानाच, या पावसादरम्यान, पातलीपाडा पुलाच्या उतरणीवर कंटेनर उलटल्याने घोडबंदरच्या ठाणे वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली आहे. कंटेनर बाजूला करण्यासाठी दोन क्रेनच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे शहरातून जाणारा घोडबंदर मार्ग हा मुंबई, मीरा-भाईंदर आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वाहनांचा अपघात झाला तर वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम इतर मार्गांवर होतो. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा हे चित्र दिसून आले. पातलीपाडा पुलावर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका वाहनचालकांना बसला.
घोडबंदर-ठाणे मार्गावरील पातलीपाडा पुलाच्या उतरणीवर गुरुवारी एका कंटेनरचा अपघात झाला. हा कंटेनर सुरुवातीला रस्त्याच्या दुभाजकावर चढला होता. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू असतानाच तो रस्त्यावर उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
कंटेनर बाजूला करण्यासाठी दोन क्रेन लावण्यात आल्या असून, कंटेनर हटविण्याचे काम सुरू आहे. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने घोडबंदरच्या ठाणे वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरात गुरुवार पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
