ठाणे : मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे ३० मेपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए आदी यंत्रणांना मंगळवारी दिले. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त राव यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिवहन सेवेच्या बसमधून पाहणी दौरा केला.
पूर्व द्रुतगती महामार्ग, कापुरबावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणीत कापुरबावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली, ओवळा चौक, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणांचा समावेश होता. गायमुख चौपाटीसमोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचे तातडीने काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अमृत जलवाहिनी, मेट्रो खांबाखालील काँक्रीटीकरण, सेवा रस्ता मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लिप रोड दुरुस्ती, चौकांचे काँक्रीटीकरण, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यांसारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
गायमुख ते कापुरबावडी मार्गावरील नागलाबंदर, आनंदनगर चौक, वावचळ ब्रिज, कासारवडवली, गवळीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात मर्जिंग, रस्ते दुरुस्ती आणि पुलांची पाहणी करत मर्जिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या जलवाहिनी आणि विद्युत खांब तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेशही दिले.
दिशादर्शक फलक लावावेत
घोडबंदर रोड विलीनीकरण झालेल्या रस्त्यांवर आयलँड, बसबे, रिक्षास्टॅण्ड तयार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच पार्किंग, नो पार्किंग आदी दिशादर्शक फलक लावण्याचे सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. घोडबंदर रस्त्यावरील मुख्य नाला कलव्हर्ट, गटारे पावसाळ्यापूर्वी पूर्ण साफ करण्यात यावी. पावसाळ्यात गटारे, नाल्यामुळे रस्तयावर पाणी येणार नाही या दृष्टीने साफसफाई करण्यात यावी. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडणार नाही, या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.
दरवर्षी खड्डे पडणाऱ्या ठिकाणांवर पूर्वतयारी केली जाणार असून कामे लवकर पूर्ण होतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
