ठाणे – मुंबई महानगरातील सर्वाधिक वर्दळीच्या घोडबंदर मार्गाची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे आल्यानंतर पालिकेने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य आणि सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होत असतानाच, आता उड्डाण पुलांवरील मास्टिकचे धोकादायक फुगवटे हटवून खड्डे भरण्याची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा यंदा खड्डेमुक्त प्रवास होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखदरम्यानचा रस्ता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आल्यानंतर पालिकेने पावसाळ्यापूर्वीच रस्ते आणि उड्डाण पुलांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करत कामांना वेग दिला आहे. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर आता उड्डाण पुलांवरील मास्टिकचे धोकादायक फुगवटे हटवून खड्डे भरण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. कापुरबावडी, वाघबीळ, पातलीपाडा आणि मानपाडा उड्डाण पुलांवरील दुरुस्तीमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई आणि गुजरातच्या दिशेने जाणारा हा महत्त्वाचा मार्ग दररोज हजारो वाहनांनी गजबजलेला असतो. घोडबंदर परिसरात वाढणारी गृहसंकुले, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे या रस्त्यावर सतत वाहतुकीचा ताण असतो. त्यातच मेट्रो प्रकल्प, सेवा रस्ते जोडणी आणि इतर विकासकामांमुळे मागील काही वर्षांपासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच उड्डाण पुलांवरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या मास्टिकचे मोठे फुगवटे झाले होते. मास्टिकच्या फुगवट्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेकदा वाहनांचे संतुलन बिघडून किरकोळ अपघातही घडत होते. अखेर ठाणे महापालिकेने कारवाई करत कापुरबावडी, वाघबीळ, पातलीपाडा आणि मानपाडा उड्डाण पुलांवरील फुगवटे हटविण्याचे काम पूर्ण केले असून आता खड्डे भरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

घोडबंदर मार्गावरील सर्व उड्डाण पुलांवरील मास्टिकचे फुगवटे काढून टाकण्यात आले असून त्यावरील खड्डे भरणीची कामेही हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांनी दिली.