ठाणे : वाहतूक कोंडी, पाणी समस्या, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या घोडबंदरमधील रहिवाशांना मागील काही महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचाही परिणामालाही सामोरे जावे लागत आहेत. घोडबंदर भागात विविध प्रकल्पांच्या कामांमुळे रस्त्यांवर खोदकामे सुरु असून विद्युत तारांना धक्के लागल्याने अधिक प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण कंपनीकडून केला जात आहे. परंतु रात्री-अपरात्री देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला. मागील तीन महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात किमान १० ते १५ दिवस वीजेचा लपंडाव सुरु असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

विद्युत समस्येपासून तोडगा काढण्यासाठी काही रहिवाशांनी हजारो रुपयांचे इन्व्हर्टर देखील खरेदी केले आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सर्वाधिक त्रास बालके, वृद्ध आणि घरुन काम करणाऱ्या नोकरदारांना सहन करावा लागतो.

ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख पट्ट्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात ३० ते ४० मजल्यांची गृहसंकुले उभी राहत असल्याने मुंबई तसेच उपनगरातील अनेकांनी येथे गृहखरेदी केली. परंतु रस्ते खोदकामे, वाहतूक कोंडी, पाण्याची समस्या यामुळे येथील रहिवासी हवालदील झाले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून या भागात विद्युत पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), ठाणे महापालिका यासह विविध विभागांकडून प्रकल्प किंवा इतर कामांसाठी खोदकामे सुरु असतात. त्याचा परिणाम येथील विद्युत पुरवठ्यावर बसू लागला आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात १० ते १५ दिवस विद्युत पुरवठा खंडित होत असतो. अनेकदा १५ मिनीटे तर कधी तीन ते चार तास विद्युत पुरवठा सुरळीत नसतो. उकाडा सुरु असतानाच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वृद्ध, महिलांचे प्रचंड हाल होतात. अनेकजण घरून काम करतात. त्यांनाही याचा परिणाम सहन करावा लागतो. काहीजणांनी तोडगा म्हणून नाइलाजाने इन्व्हर्टर खरेदी केले आहेत.

घोडबंदर रोडवर एमएमआरडीएच्या माध्यमातून सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे तारांचे नुकसान होणे ही नित्याची बाब झाली आहे. तसेच, या तारांच्या नुकसानीमुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आम्हाला तारा जोडाव्या लागतात. परिणामी, तारांमध्ये अनेक ठिकाणी जोड तयार झाले आहेत. ज्यामुळे पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. अशाच रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे, मार्च महिन्यात एकूण २८ वेळा महावितरणच्या तारांना धक्का लागला होता.

महावितरणने एमएमआरडीएच्या संबंधित विभागाला पत्र लिहून कळविले आहे. त्याचबरोबर, नवीन तारा टाकण्याचे ७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर असून ठाणे महापालिका तर्फे निविदा देऊन ठेकेदार नियुक्त केलेला आहे .सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले.

घोडबंदर भागात वारंवार विद्यतु पुुरवठा खंडित होतो. घोडबंदर भागातील नागरिकांचा वीज पुरवठा तक्रारी संदर्भात व्हाॅट्सॲप समूह तयार केला आहे. या समूहामध्ये नागरिकांच्या विद्युत पुरवठ्याविषयी तक्रारी येत आहेत. अनेकदा रात्री देखील विद्युत पुरवठा खंडित होतो. नागरिकांना घोडबंदरमध्ये वास्तव्य करणे आता कठीण होत आहे. येथील खंडित विद्युत समस्येविषयी तोडगा काढणे आवश्यक आहे. – डाॅ. प्रिया डिसिल्वा, रहिवासी, घोडबंदर रोड.