ठाणे – नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच, आता गेल्या काही दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होऊ लागला आहे. यामुळे या भागात टंचाईची समस्येत वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मुंबई महानगरातील महत्वाचा मार्ग म्हणून घोडबंदर रस्ता ओळखला जातो. या मार्गावरून अवजड तसेच स्थानिक वाहनांची दिवसरात्र मोठी वर्दळ सुरू असते. याच मार्गावर मेट्रो कामामुळे काही ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते होते. परंतु त्यावर वाहने बेकायदा उभी केली जात असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच मुख्य मार्गही अनेक ठिकाणी अरुंद झाल्याने कोंडी होत होती. ही बाब लक्षात घेऊन घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीए मार्फत हे काम करण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्ता जोडणीची कामे झाली आहेत.
या मार्गावरील सेवा रस्त्याखालून विद्युत तसेच जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी उन्नत विद्युत वाहीन्या आहेत. भुमिगत तसेच उन्नत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी पदपथाच्या नाल्यालागूनच व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. त्यातून या वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. हे काम अद्याप सुरू झालेले नाही. सद्यस्थितीत काही ठिकाणी खोदकामामुळे तर, काही ठिकाणी रस्ते काँक्रीटी कामामुळे विद्युत वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन त्या भागांचा वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी, या भागात आधीच पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच, त्यात विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम होत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. मोटार बंद राहत असल्याने पाणी पुरेशा क्षमतेने वितरित होत नसल्याने गृहसंकुलांना कमी पाणी उपलब्ध होत असून यामुळे निर्माण होणाऱ्या टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
घोडबंदर मार्गाच्या कामादरम्यान अनेकदा विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडतात आणि यामुळे वीज पुरवठा खंडीत होतो. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी प्रतिक्रिया कासारवडवलीमधील रहिवाशी प्रशांत लोहकरे यांनी दिली. तर, वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा वितरण व्यवस्था ठप्प होते आणि त्यामुळे पुरेसे पाणी गृहसंकुलांना मिळत नाही, अशी प्रतिक्रिया आनंदनगरचे रहिवाशी संजय पाटील यांनी दिली.
घोडबंदर रोडवर एमएमआरडीए तर्फे सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे विद्युत वाहिन्यांचे नुकसान होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. तसेच, या विद्युत वाहिन्यांच्या नुकसानीमुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आम्हाला विद्युत वाहिनी जोडावी लागते. परिणामी, विद्युत वाहिनीमध्ये अनेक ठिकाणी जोड पडले आहेत. ज्यामुळे पुरवठ्यावरही परिणाम होत आहे. अशाच रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे, मार्च महिन्यात एकूण २८ वेळा महावितरणच्या विद्युत वाहिनी तुटले आहेत. महावितरणने एमएमआरडीएच्या संबंधित विभागाला पत्र लिहून कळविले आहे. त्याचबरोबर, नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे ७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर असून ठाणे महानगरपालिका तर्फे निविदा देऊन ठेकेदार नियुक्त केलेला आहे .सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती महावितरण जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
