ठाणे : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली उड्डाणपुलावर शुक्रवारी पहाटे एक धक्कादायक अपघात घडला. १२ टन वजनाचे गूळ वाहून नेणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि तो अक्षरशः उड्डाणपुलाच्या कडेला लटकून राहिला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि गुजरातला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, या मार्गावर दररोज हजारो जड व अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असते. परिसरातील वाढती लोकवस्ती आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते.

पुण्याहून डहाणूकडे १२ टन गूळ घेऊन जाणारा ट्रक शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली उड्डाणपुलावर पोहोचला. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्यावर आदळला. धडकेचा जोर इतका होता की कठड्याचा काही भाग तुटून ट्रकचा पुढील भाग उड्डाणपुलाच्या बाहेर लटकला. ट्रक अर्धवट अवस्थेत अडकून राहिल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या उड्डाणपुलाखाली सध्या रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ट्रक पुलावरच अडकून राहिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक सुरक्षितपणे हटविण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र ट्रकची स्थिती धोकादायक असल्याने तो तातडीने हटविणे शक्य झाले नाही. सकाळी साडेदहा वाजेपर्यंतही ट्रक रस्त्यावरून हटविण्यात यश आले नव्हते. त्यामुळे घोडबंदर मार्गावर दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अपघातग्रस्त वाहन ११ वाजताच्या सुमारास रस्त्यामधून बाजूला करण्यात आले.