ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर घोडबंदर मार्गावरील करपे कंपाऊंड परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा मंगळवारीही पूर्णपणे झाला नसल्याने घोडबंदर घाट मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर येथील भाईंदरपाडा ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवघरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वसई-विरार, पालघर, मिरा-भाईंदर येथून ठाण्याकडे येणारे तसेच ठाण्यातून मिरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, गुजरात, बोरिवली आणि दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाणे, पालघर, मुंबई उपनगर तसेच गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उरण येथील जेएनपीए बंदर, नाशिक आणि भिवंडी परिसरातून निघणारी हजारो अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण परिसरातील वाहतुकीवर होतो.
सोमवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मंगळवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी करपे कंपाऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. घोडबंदर मार्ग अरुंद असून एका बाजूला खाडी असल्याने पाण्याचा निचरा संथ गतीने होत आहे. परिणामी मंगळवारीही रस्त्यावर पाणी कायम राहिल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि मोठी कोंडी निर्माण झाली.
ठाण्याहून मिरा-भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भाईंदरपाडा ते चेना परिसरापर्यंत, तर मिरा-भाईंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर चेना ते नवघरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळी नोकरदार, मालवाहतूक करणारे ट्रकचालक तसेच अन्य वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागले.
विशेष म्हणजे, सोमवारीही याच मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी घोडबंदर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
