ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जाणारा घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत केला आहे. या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचा सर्व खर्च ठाणे महापालिकेलाच करावा लागेल, अशी अट हस्तांरण करताना टाकण्यात आली असून यामुळे पावसाळ्यापुर्वी रस्ते तसेच उड्डाण पुल दुरुस्तीसाठी पालिकेेने अडीच कोटींचा निधी मंजुर करत निविदा काढल्या आहेत.
असे असले तरी, पुढच्या वर्षभरात उड्डाणपुलांच्या पोहच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातून घोडबंदर मार्ग जातो. तो मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड तसेच स्थानिक वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सर्वाधिक वर्दळ असलेला हा रस्ता असून हा राज्य मार्ग आहे. ठाणे ते फाऊंटेन हाॅटेलपर्यंतचा हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाने २००० साली विकसित केला होता.
बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता विकसित करण्यात आला होता. या रस्त्यावर पथकर नाका होता. त्याची मुदत २३ फेब्रुवारी २०२१ रोजी संपुष्टात आल्यानंतर महामंडळाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला होता. हा रस्ता ठाणे महापालिका तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत येतो. फाऊंटेन ते गायमुख पर्यंतचा ४.४ किमी रस्ता मिरा-भाईंदर पालिकेच्या अखत्यारित असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मिरा-भाईंदर पालिकेकडे यापुर्वीच हस्तांतरित केला आहे. तर, कापुरबावडी ते गायमुख पर्यंतचा १०.५ किमीचा रस्ता ठाणे महापालिकेच्या अख्यारित येत असून हा रस्ता हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेला दिला होता.
महापालिकेने यापूर्वीच हा रस्ता स्वीकारण्यास संमती दर्शवली होती. त्यानुसार शासनाने काही अटींसह हस्तांतरणास मंजुरी दिली आहे. पालिकेवर देखभाल खर्चाचा बोजा हा रस्ता हस्तांतरीत करताना शासनाने काही अटी लागू केल्या आहेत. त्यात, रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचा सर्व खर्च ठाणे महापालिकेलाच करावा लागेल, शासनाकडून कोणतेही अतिरिक्त अनुदान मिळणार नाही. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी महापालिकेची राहील. या रस्त्याशी संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणेही महापालिकेलाच हाताळावी लागतील. हस्तांतरणानंतर रस्त्याच्या साखळी क्रमांकात कोणताही बदल होणार नाही, अशा अटींचा समावेश आहे. त्यामुळे खर्चाचा बोजा पालिकेवर पडणार आहे.
उड्डाणपुलांची दुरुस्ती
घोडबंदर सेवा तसेच मुख्य मार्गाच्या जोडणीचे काम सुरू असून यात संपुर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी, उड्डाण पुलांची दुरुस्ती मात्र करण्यात आलेली नाही. या पुलांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. तसेच काही ठिकाणी काँक्रीटची कामे झालेली नाहीत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या उड्डाण पुलांवर आणि त्याच्या पायथ्याशी डांबरी रस्ते आहेत. याठिकाणी दरवर्षी खड्डे पडत असून ही समस्या सोडविण्यासाठी पुढच्या वर्षभरात उड्डाणपुलांच्या पोहच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
