ठाणे : मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान घोडबंदर येथील कसरवडवली, आनंदनगर भागातील वीजपुरवठा पहाटे ४ वाजता खंडित झाला. साडेपाच तासांनतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. मात्र, याचा फटका घरातून कार्यलयीन कामकाज करणारे नोकरदार वर्गाला बसला. तसेच ऑनलाईन शाळेला उपस्थितीत राहने विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. याशिवाय नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

ठाणे शहरात मंगळवार पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका घोडबंदर परिसरातील कसरवडवली, आनंदनगर भागाला बसला असून, पहाटे सुमारे ४ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी ९.३० वाजेनंतर म्हणजेच तब्बल साडेपाच तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. तोपर्यंत संपूर्ण परिसर अंधारात होता.

वीज नसल्याने जनरेटरवर लिफ्ट सुविधा सुरू होती. मात्र, काही ठिकाणी जनरेटरमधील इंधन संपल्याने त्यांचीब लिफ्टही बंद पडली. तसेच या भागात गेले काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून यामुळे या भागात टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यातच मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने संकुलांचे विद्युत पंप बंद होऊन येथील पाणीपुरवठा परिणाम झाला.

राज्य सरकारच्या आवाहनानंतर घरातून काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल चार्जिंगपासून दैनंदिन कामांपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम झाला आहे. रहिवाशांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान, साडेपाच तासांपासून अंधारात होता.