शिवसेना-आव्हाड यांच्यात पुन्हा संघर्षांची नांदी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांच्या संस्थेमार्फत येत्या फेब्रुवारी महिन्यात कळवा-खारेगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ठाणे फेस्टिव्हलसाठी सुप्रसिद्ध पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांच्या गझलसंध्येचे आयोजन करण्यात आल्याने या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत ही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच इच्छा आहे. त्यामुळे गुलाम अलींना आपण ठाण्यात निमंत्रित करत आहोत. तसेच हा कार्यक्रम उधळण्याचा कुणी प्रयत्न केल्यास कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेऊ, अशी ट्विप्पणी करत आव्हाड यांनी भाजपच्या खांद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. दरम्यान, ही ट्विप्पणी म्हणजे आव्हाडांचा प्रसिद्धी स्टंट असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जो आदेश येईल त्यानुसार आव्हाडांना प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मांडली आहे.
आव्हाड यांच्या संघर्ष संस्थेतर्फे गेल्या वर्षीपासून कळवा-खारेगाव, पारसिकनगर भागात ठाणे फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.यंदा ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून १३ तारखेला सायंकाळी पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या गझलसंध्येचे आयोजन करण्यात आल्याचे आव्हाड यांनी ट्वीट केल्याने या मुद्दय़ावर आव्हाड आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
ठाणे फेस्टिवलसाठी गझलसंध्याचे तोंडी निमंत्रण गुलाम अली यांनी स्वीकारले आहे. यासंबंधी येत्या बुधवापर्यंत त्यांचा निश्चित कार्यक्रम हाती येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आव्हाड यांच्या ट्विप्पणीवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे.

पाकिस्तानी कलाकाराबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. अशा वेळी पठाणकोटचा हल्ला लगेच विसरून कोणी तरी गुलाम अली यांना बोलावून शहराची शांतता धोक्यात आणत असेल तर ते चुकीचे आहे.
– संजय मोरे, महापौर ठाणे</strong>