पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील रेल ओव्हर पुलाच्या आनंदनगर सबवेच्या गर्डरचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) रविवारी सकाळी पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी एमएमआरडीए आणि कंत्राटदाराकडून ५० कर्मचाऱ्यांच्या फौज लावण्यात आली होती. या कामासाठी ठाण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. आता काम पूर्ण झाल्याने ठाण्यातील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे : प्रकल्पांची माहिती देण्यासाठी सरकार श्वेतपत्रिका काढणार ;राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

एमएमआरडीएकडून पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी, ठाणे येथे रेल्वे ओलांडणी पूलाचे रुंदीकरण आणि बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी २५८ कोटी खर्च अपेक्षित आहे. यातील २१८ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोचमार्गांचे काँक्रीटीकरण आणि रेल्वेच्या गर्डरचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाले की ठाण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा- डोंबिवली पूर्व इंदिरा चौकातील नाट्य तिकीट विक्री केंद्राचे उद्घाटन

या कामाअंतर्गत कोपरी पुलावर गर्डर बसविण्यासाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ आणि रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कोपरी पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत गर्डर बसविण्याचे काम सुरु होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी ५० कर्मचारी कामास लावण्यात आले होते. २०० टन क्षमतेच्या दोन क्रेन प्रत्यक्ष गर्डरच्या उभारणीसाठी वापरण्यात आल्या. तसेच १०० टन क्षमतेच्या दोन क्रेन गर्डर ठेवण्यासाठी वापरण्यात आली होत्या. तर २०० टन क्षमतेची एक अतिरिक्त क्रेनही सज्ज ठेवण्यात आली होती.

हेही वाचा- डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी अलका मुतालिक यांची निवड

या यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या जोरावर हे काम काही तासांत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्याने आता येथील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचेही एमएमआरडीएने सांगितले. आता पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोचमार्गांचे काँक्रीटीकरण आणि रेल्वेच्या गर्डचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण झाले की प्रकल्प पूर्ण होणार आहे. या कामामुळे पूल आठ पदरी होणार आहे.
त्यामुळे आता द्रुतगती मार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना याचा फायदा होणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girder installation work of anandnagar subway completed thane news dpj
First published on: 30-10-2022 at 13:25 IST