ठाण्यात रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. ठाणे स्थानकानजीकच्या गोखले रोड परिसरात बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. यावेळी सिकंदर शेख उर्फ बबलू (२७) या रिक्षाचालकाचा एका तरूणीशी वाद झाला. या वादातून सिकंदर शेखने संबंधित तरूणीला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या घटनेनंतर संबंधित तरूणीने पोलिसांकडे याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सिकंदर शेख याला ताब्यात घेतले. सिकंदर शेख हा राबोडी परिसरात राहणारा असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी मारहाण आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी रिक्षाचालकावर ३५४अ (१) छेडछाड, ३२३ मारहाणआणि ५०९ अश्लील कृत्य अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
फिर्यादी तरुणी आपल्या आईसोबत स्टेशन परिसरातून जात असताना रस्ता ओलांडताना क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालक सिकंदर शेख (२७) रा. राबोडी, ठाणे आणि तरुणी यांच्यात वाद झाला असता रिक्षा चालक शेख याने तरुणीला काहीतरी अपशब्द वापरले, याचा जाब विचारणाऱ्या तरुणीला रिक्षाचालकाने तिला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तरुणीने याबाबत गस्तीवर असलेल्या बीट मार्शल यांच्याकडे तक्रार केली. गस्तीवरच्या बिट मार्शल यांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी शेख याला ताब्यात घेतले.
ठाण्यात गेल्याच महिन्यात रिक्षाचालकाकडून तरूणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. ठाण्यातील तीन हाथ नाका परिसरात ७ जून रोजी एक युवती शेअर रिक्षाने मानपाडा परिसरात जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसली. रिक्षा चालक संतोष लोखंडे याने तिला नेत असताना त्याचा मित्र लहू घोगरे याला देखील रिक्षात बसवले. त्यानंतर माजिवडा जवळील गांधीनगर परिसरात त्यांनी या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या मुलीने आरडा ओरड केल्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देवून तिला मारहाण केल्यानंतर त्यांनी पीडित तरुणीला रिक्षातून ढकलून दिले. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोन हजाराहून अधिक रिक्षा चालकांची चौकशी केली होती. त्यानंतर याप्रकरणी संतोष नामदेव लोखंडे ( वय ३८) आणि त्याचा मित्र लहू घोगरे (३९) या दोघांना अटक करण्यात आली होती.