महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल

निखिल अहिरे

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

ठाणे: मुलांच्या जन्माला प्राधान्य देणाऱ्या मानसिकतेचा प्रभाव कमी होत स्त्री जन्माचे स्वागत होत असताना दत्तक योजनेतही मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती दिली जात असल्याचे गेल्या काही वर्षांत आढळून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत १७६ इतकी मुले दत्तक देण्यात आली आहेत. यामध्ये १०४ मुली तर ७२ मुलांचा समावेश आहे. या सर्व मुलांना डोंबिवली येथील जननी आशीष शिशु केंद्र आणि नेरुळ येथील विश्व बालक ट्रस्ट या शासनमान्य बालसंगोपन केंद्रातून दत्तक देण्यात आले आहे.

जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही बालसंगोपन केंद्रे चालविण्यात येतात. या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीतून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब समोर आली आहे. डोंबिवली आणि नेरुळ येथील बालसंगोपन केंद्रातून मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना मोठय़ा प्रक्रियेतून सामोरे जावे लागते. देशांतर्गत पालकांना आणि देशाबाहेरील पालकांनादेखील या केंद्रांमधून मूल दत्तक घेण्याची शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांमधून मुलांना दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन संस्था (कारा) या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी  लागते.

दत्तक गेलेल्या मुलांचे संगोपन नीट व्हावे आणि ते सुरक्षित स्थळी जावे यासाठी कारामार्फत तपासणी प्रक्रिया केली जात असल्याचे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे सांगण्यात आले आहे. ज्या मुलांना परदेशातील दांपत्य दत्तक घेतात त्या मुलांचे संगोपन कशा पद्धतीने होत आहे याबाबत त्या देशात स्थित असणाऱ्या भारतीय दूतावासाकडून वेळोवेळी माहिती घेतली जाते. त्या मुलांसाठी भारतीय दूतावासांकडून वार्षिक किंवा मासिक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

चार वर्षांत १०४ मुली

शासकीय प्रक्रियेला अधीन राहून गेल्या चार वर्षांत ठाणे जिल्ह्यातील दोन केंद्रातून सर्वाधिक १०४ मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. मूल दत्तक घेऊ इच्छिणारे बहुतांश पालक मुलींसाठी आग्रह धरताना दिसत आहेत, अशी माहिती या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका स्वयंसेविकेने दिली. अगदीच लहान मूल दत्तक घेता यावे यासाठी अनेक पालकांचा आग्रह असतो. 

परदेशातील पालकांकडून विशेष मुलांना पसंती

जिल्ह्यातील दोनही बालसंगोपन केंद्रातून परदेशातील दांपत्यांनी देखील मुलांना दत्तक घेतले आहे. यातील प्रमुख आणि सकारात्मक बाब म्हणजे या परदेशस्थित दांपत्यांकडून विशेष मुलांना स्वेच्छेने दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे महिला आणि बालविकास अधिकारी यांनी सांगितले. मागील चार वर्षांंत दत्तक गेलेल्या एकूण १७६ मुलांमध्ये डोंबिवली येथील बालसंगोपन केंद्रातून १५ बालकांना तर नेरुळ येथील २७ बालकांना परदेशातील दांपत्यांनी दत्तक घेतले आहे. यामध्ये २१ मुले तर २१ मुली आहेत. या बालकांमध्ये विशेष मुलांचा समावेश अधिक आहे.

ज्या नागरिकांना मूल दत्तक घ्यायचे असेल त्यांनी सर्वप्रथम जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाला संपर्क साधावा. तसेच १०९८ या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना मूल दत्तक घेण्याबाबत संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून मूल दत्तक घेण्याच्या गैर प्रक्रियेने जाऊ नये.

महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, ठाणे