ठाणे – केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या वतीने प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखित एकाच ठिकाणी सर्वांना पाहता यावे, त्याचा अभ्यास करता यावा यासाठी ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये अशा हस्तलिखितांचे सर्वेक्षण करून त्याचे डिजिटलायजेशन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ही विविध ग्रंथालयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
या राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला ठाणे जिल्ह्यातही प्रतिसाद मिळत असला, तरी स्थानिक ग्रंथालयांमध्ये हस्तलिखितांच्या प्रताधिकार आणि वापराबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे या संबंधित ग्रंथालयांनी आपले दुर्मिळ हस्तलिखित सरकारकडे अद्याप सोपविलेले नसल्याची माहिती आहे. तर याबाबत जिल्हा ग्रंथालय विभाग संबंधित ग्रंथालयांशी संवाद साधत आहे.
देशाला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, संवर्धन व डिजिटायझेशन करून त्यांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह तयार करणे हा आहे.
मार्च २०२६ पासून देशव्यापी सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ झाला असून, शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये तसेच खासगी संग्रहक यांच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा डेटा संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या हस्तलिखितांच्या मालकी हक्कांबाबत ग्रंथालयांमध्ये संभ्रम आहे. चौकट ठाणे जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत शंभर वर्षांहून अधिक जुनी ग्रंथालये आणि त्यांच्याकडे असलेली दुर्मिळ हस्तलिखिते सर्वेक्षणात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
मात्र, या प्रक्रियेत हस्तलिखितांची मालकी कायम राहणार का, तसेच त्यांचा पुढील वापर कशासाठी केला जाणार याबाबत ग्रंथालय प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा संग्राहकांकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात माहितीच्या अभावामुळे अनेक ग्रंथालयांनी अद्याप त्यांच्या संग्रहाची नोंदणी केलेली नाही. ‘ज्ञानभारतम्’ मोबाईल अॅपवरही संबंधित माहिती अपलोड करण्यास काही संस्था पुढे आलेल्या नाहीत.
जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात जनजागृती व समन्वय वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, ग्रंथालयांचा विश्वास संपादन करण्यावर भर दिला जात आहे. हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा सुरक्षित ठेवत त्याचे डिजिटायझेशन करण्यासाठी स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. दरम्यान, या मोहिमेत शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच सांस्कृतिक संघटनांचा सहभाग अपेक्षित असून, नागरिकांनीही आपल्या कडे असलेल्या हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञानभारतम्’ अॅपवर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट ठाणे जिल्ह्यातील काही ऐतिहासिक वाचनालयांनी शंभर वर्षांहून अधिक काळ ज्ञानसेवा देत समृद्ध वारसा जपला आहे. यामध्ये ठाणे नगर वाचन मंदिर, मराठी ग्रंथसंग्रहालय, सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि वाचन मंदिर भिवंडी या चार प्रमुख ग्रंथालयांचा समावेश होतो. या ग्रंथालयांकडे दुर्मिळ ग्रंथ, प्राचीन साहित्य आणि मौल्यवान हस्तलिखितांचा समृद्ध साठा उपलब्ध असून, त्यामध्ये इतिहास, धर्म, साहित्य आणि पारंपरिक ज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नोंदी जतन करण्यात आल्या आहेत.
या सर्व ग्रंथालयांना देखील याबाबत अवगत करण्यात आले आहे. कोट ‘ज्ञानभारतम्’ द्वारे हस्तलिखितांचे नोंदणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात ही शंभर वर्षाहून जुनी असलेल्या ग्रंथालयांना या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. – प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे
