कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका काळी काच असलेल्या मोटीराला थांबविण्याचा प्रयत्न या भागात तैनात असलेल्या एका वाहतूक सेवकाने केला. मात्र मोटार चालक न थांबता पळून गेला. वाहतूक सेवकाने दुचाकीवरून मोटारीचा पाठलाग करून त्याला कल्याण-शीळाफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर कंपनीजवळ अडविले. या मोटारीतून वाहतूक सेवकाने एकाला ताब्यात घेतले. तर, अन्य एक जण पळून गेला. पोलीस चौकशीत हे बकरी चोर असल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहतूक सेवक आबिद मोमिन फरहान शेख हा बैलबाजार भागातील वल्लीपीर रस्त्यावर तैनात होता. संशयास्पद वाहने बाजुला घेऊन वाहतूक सेवक आबिद शेख हे वाहन चालकांची आणि वाहन कागदपत्रांची तपासणी करत होते. दरम्यान, एक काळा काचा लावलेली मोटार भरधाव वेगाने मुरबाड रस्त्याने येऊन वल्लीपीर रस्त्याने जात होती. आबिद शेख यांना संशय आल्याने त्यांनी मोटार चालकाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मोटार चालकाने पळ काढला.

दोघांपैकी एकाला पकडले, तर अन्य एकजण पळाला –

मोटार चालक न थांबल्याने या मोटारीत काहीतरी संशयास्पद असावे म्हणून आबिद यांनी दुचाकीवरून संबंधित मोटारीचा पाठलाग केला. मोटार चालकाला आपला वाहतूक सेवक पाठलाग करत आहे हे लक्षात आले. त्याने मोटार कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील नेतिवाली नाका येथील टाटा पॉवर कंपनीच्या बाजुला सोडून पळ काढला. तोपर्यंत आबिद तेथे पोहचले. त्यांनी मोटारीतून पळणाऱ्या दोघांपैकी एकाला पकडले. तर अन्य एकजण पळाला. मोटारीतील व्यक्तीची चौकशी केली असता, त्याने आम्ही कसारा येथून चोरून आणलेल्या बकऱ्या टेम्पो मधून विक्रीसाठी चालविल्या आहेत, अशी माहिती वाहतूक सेवकाला दिली. मोटारी मधील व्यक्ती चोर असल्याचे समजल्यावर आबिद यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ, महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अशोक होनमाने यांना ही माहिती दिली.

सतर्कतेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक –

पोलीसांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी बकऱ्या असलेल्या टेम्पोसह, मोटार आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. चोरीच्या बकऱ्या कसारा येथून कोणत्या गाव, वाडीतून चोरून आणल्या आहेत. चोरीच्या बकऱ्या कुठे विक्रीसाठी नेण्यात येणार होत्या, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवाय फरार झालेल्या अन्य व्यक्तीचा देखील पोलीस शोध घेत आहेत. वाहतूक सेवक आबिद शेख यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.