scorecardresearch

डोंबिवलीत रिक्षेत विसरलेले महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चालकाकडून परत

आतापर्यंत रिक्षा चालक म्हणजे वाढीव भाडे घेणारा, भाडे नाकारणारा अशी एक प्रतीमा काही रिक्षा चालकांमुळे निर्माण झाली आहे.

डोंबिवलीत रिक्षेत विसरलेले महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चालकाकडून परत
डोंबिवली पश्चिमेत महिला प्रवाशाला सोन्याचे दागिने असलेली पिशवी परत करताना रिक्षा चालक संतोष राणे. ( image – लोकसत्ता टीम )

डोंबिवली पश्चिमेत एक महिला प्रवासी आपली पिशवी सोमवारी रिक्षेत विसरली. पिशवीत पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. रिक्षेतून उतरुन घरी गेल्यानंतर या महिलेला आपली सोन्याचे दागिने असलेली पिशवी रिक्षेत विसरली असल्याचे लक्षात आले. या महिलेने तात्काळ रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळावर धाव घेतली. त्यावेळी संबंधित रिक्षा चालकाने त्या महिला प्रवाशाची रिक्षेत विसरलेली पिशवी परत केली.

दीपाली राजपूत असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. बाहेरगावहून आल्यानंतर त्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावरील संतोष राणे या रिक्षा चालकाच्या रिक्षेत त्या बसल्या. घरा जवळ त्या जवळील इतर पिशव्या घेऊन उतरल्या. घरी गेल्यानंतर पाच तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी आपण रिक्षेत विसरल्याचे दीपाली यांच्या लक्षात आले. त्या तात्काळ दुसऱ्या रिक्षेने रेल्वे स्थानका जवळील फुले रिक्षा वाहनतळा वर आल्या. त्यांनी घडला प्रसंग इतर रिक्षा चालकांना सांगितला.

हेही वाचा… डोंबिवलीत शंकेश्वरनगरमध्ये मोटारीच्या धडकेत पाळीव श्वान ठार

दीपाली राजपूत यांना रिक्षेने घेऊन जाणारा रिक्षा चालक प्रवासी भाडे घेऊन गेले होते. तेथून परत येताना त्यांना रिक्षेत एक महिला प्रवासी पिशवी विसरुन गेली आहे असे लक्षात आले. फुले रिक्षा वाहनतळावर येईपर्यंत रिक्षा चालकांची वाहनतळावर गर्दी झाली होती. महिला प्रवासी दीपाली तेथे उपस्थित होत्या.

हेही वाचा… कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जागेत बेकायदा गाळ्यांची उभारणी

रिक्षा चालक राणे फुले रिक्षा वाहनतळावर येताच त्यांनी दीपाली यांची रिक्षेत विसरलेली सोन्याचे दागिने असलेली पिशवी त्यांना परत केली. पिशवी मिळते की नाही या काळजीत असलेल्या दीपाली यांना पिशवी परत मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. आतापर्यंत रिक्षा चालक म्हणजे वाढीव भाडे घेणारा, भाडे नाकारणारा अशी एक प्रतीमा काही रिक्षा चालकांमुळे निर्माण झाली आहे. रिक्षा चालक संतोष राणे यांनी आपल्यातील प्रामाणिकपणे दाखवित रिक्षा चालकांमध्ये चांगुलपणा आहे हे दाखवून दिले आहे. राणे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष भगवान मोरजकर, राजा चव्हाण यांनी त्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या