कल्याण – कल्याणमधील एका महिला डॉक्टरच्या घरात १६ लाख २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या ऐवजाची चोरी झाली आहे. ही चोरी आपल्या घरात काम करणाऱ्या दोन गृह सेविकांनी केली असल्याचा संशय घेऊन महिला डॉक्टरने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील लूड्स शाळेजवळील एका सोसायटीत हा चोरीचा प्रकार घडला आहे.

या चोरी प्रकरणी डॉक्टर सीमा मालणकर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ऑगस्ट २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा चोरीचा प्रकार तक्रारदारच्या घरात घडला आहे.तक्रारदार डॉक्टर मालणकर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घरात शयनगृहातील खोली मध्ये कपाट आहे. या कपाटातील तिजोरीमध्ये मी माझे सोन्याचे दागिने ठेवले होते.

ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दागिने तिजोरीमध्ये दिसत होते. परंतु त्यानंतर हे दागिने गायब झाल्याचे मला दिसले. घरामध्ये चोरी झाली नसताना आणि बाहेरील कोणी घरात आले नसताना तिजोरीतील सोन्याचे किमती दागिने गायब झाल्याने मी घरात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला. पण दागिने मिळून आले नाहीत.माझ्या घरात दोन गृहसेविका काम करतात. त्यांचा घरात सतत वावर असतो. त्यामुळे त्यांनीच माझ्या दागिन्यांची चोरी केली असल्याचा संशय आहे. असा संशय व्यक्त करून तक्रारदार डॉक्टर मालनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.