scorecardresearch

काळजी वाहकाकडून ११ लाखाची चोरी, ३२ तोळे सोन्याची लूट, कल्याणमधील गोदरेज हिलमधील प्रकार

घरांमध्ये ज्येष्ठ, वृध्द, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी काळजी वाहक ठेवताना रहिवाशांनी प्रथम त्याची चौकशी करावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

कल्याण-कल्याण पश्चिमेतील उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदरेज हिल भागात घरातील मुलांची काळजी घेणाऱ्या एका काळजी वाहकाने आपल्या बहिणीच्या साथीने ११ लाख ४० हजार रूपयांच्या ऐवजाची चोरी केली आहे. यामध्ये ३२ तोळे सोन्याचा समावेश आहे. खडकपाडा पोलिसांनी फरार काळजी वाहकाचा तपास सुरू केला आहे.

भिकास बोहरा (३०), सिता राणा (२८) अशी आरोपींची नावे आहेत. हे बहिण भाऊ कल्याण पश्चिमेतील बारावे येथील गावदेवी मंदिर ढोणे चाळ येथे राहतात. पोलिसांनी या चोरीप्रकरणी दिलेली माहिती अशी, कमल किशोर गौड (४०) हे व्यासायिक आहेत. ते गोदरेज हिलमधील रिव्हरडेल व्हिस्टा संकुलात पत्नी, मुलांसह राहतात. व्यसायानिमित्त दररोज बाहेर जावे लागत असल्याने कमल गौड यांनी बारावे भागातील भिकास बोहरा या तरूणाला घरात मुलांची काळजी घेण्यासाठी ठेवले होते. कुटुंबातील सदस्यासारखी गौड कुटुंब भिकासला वागणूक देत होते. भिकासवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

गौड कुटुंब काही कार्यक्रमा निमित्त बाहेर गावी गेले होते. या संधीचा गैरफायदा घेत भिकास याने बहिण सिता हिच्या मदतीने गौड कुटुंबाच्या घरात चोरी करण्याचे नियोजन केले. घरातील तिजोरी, ऐवजाची साधारण माहिती भिकासला होती. एक दिवस भिकास बहिणीसह दुपारच्या वेळेत कमल गौड यांच्या घरी आला. तो नियमित असल्याने सोसायटीतील सुरक्षा रक्षक किंवा रहिवाशांना संशय आला नाही. बनावट चावीच्या साहाय्याने त्याने घराचा दरवाजा उघडला. शय्यागृहातील कपाट उघडून तिजोरी घरातील धारदार वस्तूने फोडून तिजोरीतील ३२ तोळे सोने, ११ लाख ४० हजार रुपयांचा चांदी व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला. गौड कुटुंब बाहेरगावाहून आले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. कमल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काळजी वाहक भिकास व त्याच्या बहिणीवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

घरांमध्ये ज्येष्ठ, वृध्द, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी काळजी वाहक ठेवताना रहिवाशांनी प्रथम त्याची चौकशी करावी. त्याचा निवास पत्ता, त्याचा मोबाईल, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही याची खात्री करावी. काळजी वाहका बरोबर रहिवाशाने एक समन्वयाचे करारपत्र तयार करून त्याची प्रत स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold theft in kalyan godrej hill society asj

ताज्या बातम्या