डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग प्रभाग हद्दीतील राजाजी रस्ता, रामनगर, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पथ, मानपाडा रस्ता भागातून ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी फेरीवाल्यांविरुध्द आक्रमक कारवाई करुन फेरीवाल्यांच्या हातगाड्या, विक्री मंच, सामान असे एकूण सुमारे एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. अचानक करण्यात आलेल्या या आक्रमक कारवाईमुळे फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. सहा तासाच्या कारवाईत दोन टेम्पो सामान जप्त करण्यात आले.

सतत कारवाई करुनही फेरीवाले डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्दीतील डाॅ. राॅथ रस्ता, राजाजी रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, उर्सेकरवाडी, टिळक सिनेमा गल्ली, वाहतूक विभाग कार्यालय रस्त्यावर बसत असल्याने या फेरीवाल्यांवर अचानक कारवाई करण्याचे नियोजन डोंबिवली विभागाच्या विभागीय उपायुक्त स्वाती देशपांडे, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी केले. दुपारी तीन नंतर फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथ अडवून सामान ठेवण्यासाठी मंच लावण्यास सुरुवात केली. फेरीवाल्यांची दुकाने सामान विक्रीसाठी सज्ज होताच ग प्रभागाचे पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी फेरीवाला हटाव पथकाची सुनील वेदपाठक, राज गोहील, नरेंद्र कोबाळकर, दीपेश भोईर, रमेश डुंबरे, के. सी. चिंडालिया, दत्ता चौधरी यांची गटाने पथके तयार केली.

हेही वाचा : मानपाडा भागात महावितरणची उच्चदाब वाहिनी तुटली

या कर्मचाऱ्यांनी चारही बाजुने फेरीवाल्यांना रस्त्यांवर घेरण्यास सुरुवात केली. मुख्य रस्त्यांवर फेरीवाला सामान जप्तीचे वाहन उभे करण्यात आले. फेरीवाल्यांना जाळ्यात अडकविल्याने त्यांना कुठे पळता आले नाही. या कारवाईत मानपाडा रस्ता, राजाची पथ, रामनगर, टिळक सिनेमा गल्ली भागातील चप्पल विक्रेते, फळ विक्रेते, मोबाईल सामान विक्रेते, कपडे विक्रेते यांचे सामान जप्त करण्यात आले. एकाही फेरीवाल्याला आजुबाजुला पळून देण्यात आले नाही, असे पथक प्रमुख साळुंखे यांनी सांगितले. दुपारी तीन वाजता सुरू केलेली कारवाई रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. दत्तनगर, सुनीलनगर, प्रगती महाविद्यालय भागातही फेरीवाले हटविण्याची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : स्मार्ट सिटी प्रकल्पातील रखडलेली विकासकामे मार्गी लागणार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाने फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई केल्याने प्रवासी, पादचाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत होते. फेरीवाले रस्ते, पदपथांवरुन हटविण्यात आल्याने नागरिकांना प्रथमच प्रशस्त रस्त्यांवरुन चालता येत होते. अशीच कारवाई फ प्रभागाने सुरू करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवली ग प्रभागातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई दररोज केली जात आहे. आता ही कारवाई आक्रमकपणे केली जाणार आहे. ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला दिसणार नाही असे नियोजन विभागीय उपायुक्त स्वाती देशपांडे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्या साहाय्याने तयार करण्यात आले आहे. – संजय साबळे ,साहाय्यक आयुक्त ग प्रभाग, डोंबिवली