चायनीज खाद्यपदार्थ देण्यास उशीर केल्याने उल्हासनगरच्या कॅम्प चार भागात काही तरूणांनी चायनीज विक्रेता आणि त्याच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी विक्रेत्याच्या पोटावर चाकूने वार केले असून त्यांच्या नातेवाईकाचे दोन्ही हात मोडले आहेत. याप्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प चार येथील व्हिनस चौकात असलेल्या चायनीज खाद्यपदार्थाच्या दुकानात रविवारी रात्री सुशील भोईर याने जेवण पार्सल देण्याची ऑर्डर दिली होती. मात्र हॉटेल बंद झाल्याने पार्सल देण्यास उशीर झाला. त्यामुळे सुशील भोईर याने ज्ञानेश्वर भोईर याला दुकानात पाठवले. यावेळी फिर्यादी दुकानदार दर्शन संतलाल राय आणि ज्ञानेश्वर भोईर यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन ज्ञानेश्वर भोईर याला दर्शन राय यांनी मारहाण केली. त्याचा राग आल्याने ज्ञानेश्वर भोईर याने त्याच्या इतर साथीदारांना पाचारण केलं.
त्यावेळी सुशील भोईर, शैलेश भोईर, अशोक कोळी आणि त्याचे पाच ते सहा सहकाऱ्यांनी दर्शन राय यांच्या डोक्यावर लोखंडी सळई, काचेच्या बाटलीने हल्ला केला. तसेच एका आरोपीनं त्याच्याजवळ असलेल्या चाकुने दर्शन राय यांच्या पोटावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दर्शन राय यांचे जावई, मुलगा आणि इतर कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी पुढे सरसावले.
मात्र हल्लेखोरांपैकी एकाने दर्शन राय यांच्या जावयावरही काचेच्या बाटलीने हल्ला केला. तसेच दोन्ही हातांवर, डाव्या पायावर गंभीर मारहाण केली. यात राय यांच्या जावयाचे दोन्ही हात मोडले आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे.