राज्य शासनाकडून २४ कोटींच्या योजनेला मंजुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर: कल्याण तालुक्यातील शहरांप्रमाणे विकसित होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील रायते, गोवेली, बापसई, मामणोली, घोटसई, आपटीसह १५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २४ कोटी ११ लाखांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबतचा प्रस्ताव तयार होता. मात्र त्याच्या अंदाजपत्रकीय रकमेची परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक असल्याने यात वेळ जात होता.

 कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या रायते, गोवेली, मामणोली तसेच शेजारीच असलेल्या बापसई, घोटसई यांसारख्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या सध्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे या गावांमध्ये स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असावी अशी मागणी होती. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यासाठी आग्रही होते. काही महिन्यांपूर्वी रायते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वर्षभरापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनीही या योजनेच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेतली होती. त्यावेळी या १५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा खर्च ५ कोटींपेक्षा अधिक असल्याने या योजनेच्या मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेला तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी सादर करण्यात आला. अखेर गेल्या आठवडय़ात राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या १५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी ११ लाख ५९ हजार ८०७ रुपयांच्या अंदाजपत्रकास आणि आराखडय़ास जल जीवन मिशन कार्यक्रमांखाली मंजुरी दिली आहे. त्यामुळे या १५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनेतील गावे

  कल्याण तालुक्यातील रायते – पिंपळोली, गोवेली – रेवती, बापसई -नवगाव, कोळिंब- केळणी, मामणोली, अनखर, घोटसई, आपटी – चोण, वाहोली आणि नांदप या १५ गावांचा या पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात आला आहे. पुढच्या ३२ वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे. योजनेतून प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जाईल. योजना चालविणे आणि देखभालीसाठीचा खर्च भागविण्याकरिता ग्रामपंचायतींना घरगुती, बिगर घरगुती आणि संस्थात्मक नळजोडणी धारकांसाठी पाणीपट्टी आकारावी लागणार आहे.

या योजनेसाठी उल्हास नदीतून पाणी उचलले जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून उंच ठिकाणावरील जलकुंभातून हे पाणी गुरुत्वाकर्षणाने गावागावांमध्ये पोहोचवले जाईल. येत्या महिनाभरात निविदा जाहीर होणार आहे. त्यामुळे या गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.

– अरुण निरभवणे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government water supply scheme villages ysh
First published on: 19-01-2022 at 00:45 IST