डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील संगीत मैफलीत रमले आजी-आजोबा | Grandparents enjoyed a music concert at Vidyaniketan School in Dombivli amy 95 | Loksatta

डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील संगीत मैफलीत रमले आजी-आजोबा

डोंबिवली- आपला नातू ज्या शाळेत दररोज जातो, ती शाळा कशी आहे. तेथील वातावरण कसे आहे.

डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील संगीत मैफलीत रमले आजी-आजोबा
(डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेतील आजी-आजोबा संमेलनात सहभागी झालेले आजी-आजोबा.)

आपला नातू ज्या शाळेत दररोज जातो, ती शाळा कशी आहे. तेथील वातावरण कसे आहे. याची उत्सुकता अनेक आजी, आजोबांना असते. यानिमित्ताने मागील काही वर्षापासून डोंबिवली जवळील मानपाडा गावातील विद्यानिकेतन शाळेत संस्थेतर्फे आजी-आजोबा संमेलन भरविले जाते. यावेळीही शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या आजी आजोबा संमेलनाला ५०० हून अधिक आजी आजोबा उपस्थित होते.निसर्गरम्य शाळा आवारातील गर्द झाडी, फुलांनी बहरलेला परिसर, प्रशस्त मैदान असलेला आपल्या नातू, नातवाच्या शाळेचा परिसर पाहून आजी, आजोबा प्रसन्न झाले.

हेही वाचा >>>ठाण्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत रंगला श्रेयवाद, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दोघांचा दावा

६० वर्षापासून ते ९० वयोगटातील आजी, आजोबा आपल्या नातवाची शाळा पाहण्यासाठी संमेलनाच्या निमित्ताने विद्यानिकेतन शाळेत उपस्थित होते. डोंबिवली, कल्याण परिसरातून आजी, आजोबांना आणण्याची व्यवस्था शाळेच्या बस मधून करण्यात आली होती. संमेलनातील आजी आजोबांचा विचार करुन त्यांना रुचतील, पटतील अशा गाण्यांचा कार्यक्रम शिक्षक, विद्यार्थिनींनी सादर केला. विद्यार्थ्यांनीच त्यांना वाद्यवृंदाची साथ दिली. आयुष्याचे टप्पे ओलांडताना गायली जाणारी गाणी यावेळी सादर करण्यात आली. एका विद्यार्थिनीने गायलेल्या लावणीवर तर उपस्थित काही आजोबांनी शीळ घालून कार्यक्रमात रंगत आणली. खोपोली जवळील कानसई गावातील स्नेहबंधन ज्येष्ठ नागरिक विसावा केंद्रातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>ठाणे: नव्या ठाण्याच्या खाडी पूलांसाठी एमएमआरडीएच्या हालचाली

विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित, संचालक अतुल पंडित आणि शिक्षक यांनी या संमेलनाचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत प्रवासाची माहिती देणारा कार्यक्रम झाला. दोन तास झालेल्या या गप्पांच्या कार्यक्रमात संगीतकार पत्की यांनी आपला बालपणापासून ते आतापर्यंतची संगीत प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी विविध गाणी, मालिकांमधील मुखड्यांना दिलेल्या चाली, विविध वाहन्यांवरील मालिकांमधील शिर्षक गितांचे सादरीकरण करुन जुन्या दिवसांची आणि काळाची आठवण करुन दिली. एका विद्यार्थीनीने रंगवलेले संगीतकार पत्की यांचे छायाचित्र त्यांना भेट देण्यात आले. डोंबिवलीतील कुष्ठ रुग्ण सेवक गजानन माने यांना पद्मश्री किताब जाहिर झाल्याने त्यांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ निवृत्त सरकारी अधिकारी, कार्पाेरेट, राजकीय मंडळी, उद्योजक, निवृत्त मुख्याध्यापक आजी, आजोबा म्हणून उपस्थित होते.सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला आजी आजोबा संमेलनाचा सोहळा दुपारी भोजनाच्या पंगतींनी संपला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 17:19 IST
Next Story
ठाण्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत रंगला श्रेयवाद, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दोघांचा दावा