१५ मार्चपर्यंत ९० हजारांहून अधिक ज्येष्ठांना लस
ठाणे : जिल्ह्यात १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून १५ मार्चपर्यंत ९० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील या लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. ठाणे जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय तसेच काही निवडक खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू असून जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई महापालिका रुग्णालयांत १ मार्च ते १५ मार्चपर्यंत ६० वर्षांपुढील ६७ हजार ८४५ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केले आहे. तर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ६० वर्षांपुढील २२ हजार ३०७ नागरिकांनी लसीकरण केले आहे. लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणास उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक जेव्हा लसीकरणास येतात, त्या वेळी त्यांना लसीकरणाआधी मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर लस दिली जात आहे. तसेच या लसीकरणामुळे त्यांना कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत.
– डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, ठाणे जिल्हा
जिल्ह्यातील लसीकरण
शहर लसीकरण
ठाणे ३६७३९
कल्याण-डोंबिवली ६८६६
उल्हासनगर २०८३
भिवंडी १४०८
मीरा-भाईंदर १४४८४
नवी मुंबई १८२७४
जिल्हा सामान्य रुग्णालय/ प्राथमिक केंद्र १०२९८
एकूण ९०१५२
