scorecardresearch

ग्रामीण भागात युवकांच्या लसीकरणास उत्तम प्रतिसाद

ग्रामीण भागात अनेक प्रौढ नागरिक करोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र असताना या भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचा लसीकरण मोहिमेस मात्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

जनजागृतीमुळे ४३ हजार मुलांचे लसीकरण पूर्ण

पूर्वा साडविलकर

ठाणे : ग्रामीण भागात अनेक प्रौढ नागरिक करोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र असताना या भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचा लसीकरण मोहिमेस मात्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या भागात अवघ्या २५ हजार मुलांचेच लसीकरण होणे शिल्लक राहिले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा लसीकरण सत्र प्रमुख डॉ. अंजली चौधरी यांनी दिली. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही ठाणे ग्रामीण भागात लाखो नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. या तुलनेत, या भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचा लसीकरण मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण मोहीम सुरू झाली त्या वेळी या भागातील नागरिकांमध्ये लशीविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे  पुढाकार घेत नव्हते. 

शहरी भागाप्रमाणे या भागातील नागरिकांचेही मोठय़ा संख्येने लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने एक समिती तयार केली. त्यामध्ये आरोग्यसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका असा समूह तयार करून करोना लसीकरणाविषयी जनजागृती मोहीम सुरू केली. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या साहाय्याने लस आरोग्यासाठी कशी उपयुक्त आहे, असा संदेश देणारी चित्रफीत, लघुपट, गाणी तयार केली. हा संदेश समाजमाध्यमांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत होता. विद्यार्थ्यांमध्ये लसीकरणाविषयी जागृती या वेळीच झाली होती. त्यामुळे या भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचा लसीकरणास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ६८ हजार २६ इतकी गृहीत धरण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ९५१ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात दररोज ८०० ते हजाराच्या आसपास या वयोगटातील मुलांचे लसीकरण होत आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह शाळा-महाविद्यालयातही लसीकरण केंद्रे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही काही शाळा तसेच महाविद्यालयातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Great response youth immunization rural areas ysh

ताज्या बातम्या