प्रेमी युगुले, बेफाम वेगाने दुचाकी चालविणारे तरुण यांच्याबरोबरच येऊरचे प्रवेशद्वार असलेल्या उपवन परिसरात आता मद्यपींनीही आपला अड्डा जमविला आहे. या निसर्गरम्य परिसरात एकांताचा गैरफायदा घेत भरदिवसाही या परिसरात दारूच्या बाटल्या घेऊन पाटर्य़ा झोडणाऱ्या मद्यपींची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, मद्याच्या नशेत धुंद झालेल्यांकडून पादचारी, विशेषत: महिलांची छेड काढण्याचे तसेच अश्लील शेरेबाजी करण्याचे प्रकारही वाढू लागल्यामुळे उपवन परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
ठाणे शहराच्या दुसऱ्या टोकावर आणि येऊर वनक्षेत्राच्या सान्निध्यात असलेला उपवन तलावाच्या आजूबाजूला नव्याने निर्माण झालेल्या गृहसंकुलांमुळे या भागातील वर्दळ वाढली आहे. उपवन तलाव परिसरातील निसर्गरम्य आणि स्वच्छ वातावरणामुळे या भागात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांचीही गर्दी असते. मात्र, तरीही या भागातील झाडे, झुडपे, कट्टे यांवर मद्यपींनी ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तरुणवर्गाचे प्रमाण जास्त आहे. तलाव परिसराच्या सार्वजनिक भागात मद्यपान करणे, मद्यपान झाल्यानंतर दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडणे, जोरजोरात बोलणे, आरडाओरड करणे असे प्रकार येथे सर्रास केले जातात. याचा त्रास स्थानिकांना होत आहे. मद्यपींच्या हुल्लडबाजीची महिलावर्गात तर दहशत पसरली आहे.
आमच्याकडे तक्रारी नाहीत
या भागातील तक्रारींकडे आम्ही पुरेशी दखल घेतली जात असून या भागात दोन बीट मार्शल नेमण्यात आले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या भागामध्ये त्यांच्याकडून गस्त घातली जात असून गैरप्रकार करणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुचाकींचे स्टंट करणाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार कारवाई केली आहे. दारुडय़ांबद्दल मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप आलेली नाही.
– के. जी. गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वर्तकनगर पोलीस ठाणे

बंदोबस्त वाढवण्याची गरज..
उपवन परिसर अत्यंत संवेदनशील बनला असून प्रेमी मंडळी, वेगवान मोटरसायकल चालवणारे तरुण आणि आता मद्यपींनी या भागाला विळखा घातला असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. दारू पिणारे लोक तलावामध्ये उतरत असून महापालिकेच्या सूचना फलकांचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही. परिसरातील गृह संकुलातील सुरक्षारक्षकही या भागात दारू पिताना आढळून आलेले आहेत. त्यामुळे या भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याची गरज आहे.
कृष्णा यादव, स्थानिक रहिवासी, गावंडबाग