ठाण्याशी ‘जवळीक’ वाढणार!

ठाणे आणि आसपासच्या शहरांतील वाहतुकीला गती देण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प सुचवले आहेत.

सात प्रकल्पांची संलग्नता वाढवण्यासाठी आठ हजार कोटींचे प्रस्ताव

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे : ठाणे आणि आसपासच्या शहरांतील वाहतुकीला गती देण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प सुचवले आहेत. या प्रकल्पांची संलग्नता वाढवण्यासाठी एक हजार १०० कोटी रूपये खर्चातून ठाणे खाडी रस्ता आणि सात हजार कोटींच्या खर्चातून ११.८ किलोमीटर लांबीच्या बोरिवली-ठाणे बोगद्याचा प्रस्ताव  मांडण्यात आला आहे. या दोन प्रकल्पांमुळे तसेच अन्य प्रकल्पांमुळे ठाणे पट्टय़ातील शहरे दळणवळणदृष्टय़ा एकमेकांच्या आणखी जवळ येणार आहेत.

महिनाभरापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा र्सवकष परिवहन अभ्यास आणि व्यवसाय आराखडा  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला होता. नुकत्याच  पार पडलेल्या एमएमआरडीएच्या १५१व्या  बैठकीत या सर्वंकष परिवहन अहवालाला  मान्यता देण्यात  आली. यात २०४१ पर्यंत कोणकोणत्या सुविधा उभारल्या जातील त्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई,  ठाणे आणि त्यापुढील शहरांमध्ये आगामी काळात वाढणारी वाहनसंख्या आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकल्प सुचवण्यात आले आहेत. त्यात कोपरी ते साकेत, कासारवडवली ते खारबाव, कोलशेत ते काल्हेर, छेडानगर ते कोपरी, तीन हात नाका, जुना आग्रा रस्ता ते मुलुंड टोलनाक्यार्पयचा सागरी मार्ग आणि कोपरी ते पाटणी पूल उभारणी या प्रकल्पांचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवरील वाहतूक सुसूत्रता वाढण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय या सात प्रकल्पांची संलग्नता वाढवून वाहतूक वेगवान करण्यासाठी आठ हजार कोटींच्या आणखी दोन प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव आहे.

यात ठाणे खाडी रस्ता प्रस्तावित असून यात गायमुख ते साकेत या ११ किलोमीटरच्या  रस्त्याचा समावेश आहे. सहा पदरी हा रस्ता उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर बोरिवली ठाणे बोगदा हा महत्वांकाक्षी प्रकल्पही या समाविष्ट आहे. हा रस्ता चार पदरी करण्याचा प्रस्ताव आहे.

यासाठी  सात हजार कोटी  रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बोगद्याची पूर्तता येत्या दहा वषार्र्त करण्याचा  मानस ‘एमएमआरडीए’ने व्यक्त केले आहे. या दोन प्रकल्पांमुळे सात प्रकल्पांची संलग्नता वाढीस लागणार आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीचा वेग वाढून कोंडीमुक्त प्रवास होण्याची आशा व्यक्त करण्यात  आली आहे. 

पुढील २० वर्षांतील उद्दिष्टे र्सवकष परिवहन आराखडय़ात येत्या २० वर्षांत ४५० किमी लांबीचे मेट्रो मार्ग, एक हजार ७४० किमीचे रस्ते, २४८ किमी लांबीचे उपनगरीय रेल्वेचे जाळे, १७ आंतरराज्य आणि शहरांतर्गत बस स्थानके, सहा शहरांतर्गत रेल्वे टर्मिनस, पाच मोठे ट्रक टर्मिनल आणि १० लहान ट्रक टर्मिनल तसेच १३ प्रवासी जलवाहतूक टर्मिनल यांची तीन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याकरिता आगामी २० वर्षांत सुमारे पाच लाख एक हजार ६३८ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Grow closer thane ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या