ठाणे : कोणत्याही वस्तू अथवा सेवा न मिळविता त्या बदल्यात सुमारे १२ कोटी रुपयांच्या कर-भरणा सुटीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) लाभ घेतल्याप्रकरणी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या ठाणे आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत येथील मेसर्स स्टार स्क्रॅप स्टील कंपनीच्या मालकाला अटक केली.

भंगाराच्या व्यवसायात कार्यरत या कंपनीवरील या कारवाईत, मुंबईच्या वस्तू आणि सेवा कर विभागाने विकसित केलेल्या विशेष गुन्हे अन्वेषण प्रणालीची मदत मिळाली आणि तिच्या आधारे ठाणे आयुक्तालयाकडून हे करचोरी प्रकरण उघडकीस आणले गेले आहे. या कंपनीला अनेक व्यापाऱ्यांकडून कोणताही माल न मिळविताच, ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळत होते. कोणत्याही मालाची पावती नसताना आणि पुरवठा केला गेलेला नसताना, फसव्या संस्थांनी जारी केलेल्या पावत्याच्या आधारे कच्च्या मालासाठी कर भरला गेल्याचा बनाव रचून, ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळविले गेले. 

स्टार स्कॅ्रप स्टील कंपनीच्या नावे ‘कर-भरणा सूट’ जमा करणाऱ्या ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील विविध फसव्या संस्थांचा तपास सुरू आहे. स्टार स्कॅ्रप स्टीलच्या मालकांना वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. प्रवर्तकांना शुक्रवारी (३ डिसेंबर) न्यायिक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.