ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या कोपरी भागाचा नुकताच पाहणी दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. या दौऱ्यावरून भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पालकमंत्र्यांवर टीका करत असे दौरे काढावे लागणे म्हणजे शिवसेनेचे महापालिकेतील पाच वर्षांतील कामाचे अपयशच असल्याचा टोला लगावला आहे.
कोपरी-पाचपाखाडी या स्वत:च्या मतदारसंघातील अर्धवट कामांची, प्रकल्पांची पालकमंत्र्यांना पाहणी करावी लागते यावरून शिवसेनेच्या अपयशावर शिक्कामोर्तब होत असल्याची टीका डावखरे यांनी केली आहे. दरम्यान, भाजपच्या टीकेवर शिवसेनेनेही उत्तर दिले आहे.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला होता. त्यापाठोपाठ वागळे इस्टेट येथील रस्त्यांची कामे आणि कोपरीतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला.
ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन, महिनाभराचा कालावधी झाल्यानंतर पालकमंत्रीमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरी-वागळे इस्टेटमध्ये काढलेले दौरे हे शिवसेनेचे महापालिकेतील पाच वर्षांतील कामाचे अपयशच आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष डावखरे यांनी केली आहे.
महापालिकेत शिवसेनेची पाच वर्षे सत्ता होती. त्यापूर्वीही कितीतरी वर्षे येथे याच पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत प्रशासक कुणीही असो आजही शिवसेना म्हणेल त्याच पद्धतीने येथील कारभार सुरू आहे. ठाणे शहराचा विकास केला असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो. प्रत्यक्षात ठाणेकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत, अशी टीका डावखरे यांनी केली.
तीव्र पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, फेरीवाले, अतिक्रमणांचा विळखा अशा परिस्थितीत ठाणेकर राहत आहेत. आता महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागल्यानंतर, पालकमंत्री शिंदे यांच्याकडून दौरे काढले गेले. त्यातून मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांबरोबरच खुद्द पालकमंत्र्यांच्याच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील विदारक स्थिती समोर आली.
संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा आढावा घेतल्यास आणखी भीषण परिस्थिती समोर येईल. अशा परिस्थितीत पाच वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणती कामे केली असा प्रश्नही डावखरे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पात कोटय़वधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही नागरिकांना काहीही फायदा झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवसेनेचाही पलटवार
आम्ही पालिकेत ३० वर्षे सत्तेत आहोत. ठाणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कुठल्या तरी लाटेवर निवडून येणारा आमचा पक्ष नाही. त्यासाठी तळागाळात काम करावे लागते. ठाणे महापालिकेत ठाणेकरांचे काम व्हावे यासाठी पालकमंत्री काम करीत आहेत. पालिकेत व्यवस्थित काम व्हावे यासाठी आम्ही देखरेख करतो. त्यामुळे तुमचा पोटशूळ आम्ही समजू शकतो. अशा कितीही टीका केल्या तरी आम्हाला त्यांनी फरक पडत नाही. ज्या ठाणेकरांनी आम्हाला ३० वर्षे सत्ता दिली, त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. यापुढेही हे काम करत राहणार, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले.