scorecardresearch

कल्याणमध्ये २५ लाखाचा गुटका जप्त ; आरोपींमध्ये उल्हासनगरमधील तीन जणांचा समावेश

२० लाख रुपये किमतीचा कंटनेर आणि गुटका मिळून एकूण ४५ लाखाचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे.

कल्याणमध्ये २५ लाखाचा गुटका जप्त ; आरोपींमध्ये उल्हासनगरमधील तीन जणांचा समावेश
२० लाख रुपये किमतीचा कंटनेर आणि गुटका मिळून एकूण ४५ लाखाचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे

कल्याण पश्चिमेतील गंधारी पुला जवळ रविवारी पहाटे तीन वाजता खडकपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने एका कंटेनरमधून प्रतिबंधित असलेला फोर के स्टार नावाचा प्रतिबंधित गुटका जप्त केला. या गुटक्याची बाजारातील किंमत २५ लाख रुपये आहे. २० लाख रुपये किमतीचा कंटनेर आणि गुटका मिळून एकूण ४५ लाखाचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे. जप्त केलेला कंटेनर कर्नाटक आरटीओ नोंदणीकृत आहे. गुटक्याच्या एकूण १३५ गोणी कंटेनरमध्ये होत्या.

मशाक मेहबुबसाब इनामदार (३५, देवण तैगनौर, ता शहाबाद, जि. गुलबर्गा), लव शामसुंदर सहाणी (२७, रा. सेक्शन २५, उल्हासनगर चार), प्रेमानंद दिनेश कोठारे (२८, रा. सध्दार्थ काॅलनी, कैलासनगर, स्मशानभूमी बाजुला, उल्हासनगर ५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रजनीकांत मोहन गायकवाड (२८, वीर तानाजी नगर, उल्हासनगर ५) असे फरार आरोपीचे नाव आहे.हवालदार नवनाथ रामचंद्र डोंगरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – कल्याण : कुटचलनातून पैसे अर्ध्या तासात दुप्पट करतो सांगून कल्याणमधील तरुणीची फसवणूक

पोलिसांनी सांगितले, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या विशेष तपास पथकातील संजय पाटील, ऋषिकेश भालेराव यांना रविवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान गुप्त माहिती मिळाली की पडघा बापगाव मार्गे एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला फोर के स्टार गुटका घाऊक पध्दतीने विक्रीसाठी वाहून नेला जात आहे. त्यांनी उपायुक्त गुंजाळ यांना ही माहिती दिली. उपायुक्तांनी खडकापाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशीत करुन गांधारी पुलाजवळ भंडारी चौकात तो कंटेनर अडविण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

गांधारी पुलाजवळ वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आंधळे, साहाय्क के. सी. दाभाडे, हवालदार संजय शामराव पाटील, ऋषीकेश भालेराव, पी. के. देवरे, सी. एस. थोरात यांनी सापळा लावला. चालक पळून जाऊ नये म्हणून गंधारे पुलाजवळ रस्ता अडथळे उभे करण्यात आले. १५ मिनिटात पडघा दिशेकडून एक कंटेनर भरधाव वेगाने कल्याण मधील गंधारे पुला जवळ आला. पोलिसांनी या संशयित कंटेनर चालकाला थांबविण्याचा इशारा करताच, तो पुढे जाऊन थांबला. पोलिसांनी कंटेनर थांबविल्याचे कळताच कंटेनरमधील रजनीकांत गायकवाड हा कंटेनरमधून उडी मारुन काळोखाचा फायदा घेत पळून गेला.

हेही वाचा- ठाणे : वर्गणी दिली नाही म्हणून ‘आयबी’ अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी चालकाला कंटेनरमध्ये काय आहे याची माहिती विचारली. तो उडवाउडवीची माहिती देऊ लागला. कंटेनरमधील सामानाची तपासणी करायची आहे असे पोलिसांनी म्हणताच चालकासह त्याचे तीन साथीदार अस्वस्थ झाले. पोलीस सभोवती असल्याने ते शांत होते. पोलिसांनी कंटेनरची पाठीमागील बाजू उघडताच सुरुवातीला पोलिसांनी लाकडी भुशाची पोती आढळली. त्यानंतर पांढऱ्या रंगाची सुंगधित गुटका असलेली पोती दडवून ठेवण्यात आली होती. तंबाखुजन्य गुटका त्यात होता. महाराष्ट्रात प्रतिबंधित असताना हा गुटका कोठे नेण्यात येत होता असे प्रश्न पोलिसांनी विचारताच चालक निरुत्तर झाला.

पोलिसांनी कंटेनरसह आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक, विक्री आणि शासन आदेशाचा भंग केल्याने आणि अन्न आणि औषध प्रशासन कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. जप्त केलेला गुटका कोठे ताब्यात घेऊन तो कुठे विक्रीसाठी चालविला होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

या प्रकरणात उल्हासनगर मधील तीन जणांचा समावेश असल्याने गुटका उल्हासनगरमध्ये विक्रीसाठी चालविला होता का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. भिवंडी जवळील काही गोदामांमधून अवैध वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री, पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. उल्हासनगरमधून अनेक नक्कल वस्तुंची मुंबई, कल्याण, ठाणे बाजारपेठेत चोरुन विक्री केली जाते. त्याच पध्दतीने हा गुटका उल्हासनगरमध्ये आणला जात होता या दिशने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gutka worth 25 lakh seized in kalyan amy

ताज्या बातम्या