ठाणे : हाजूरी येथील रस्ता रुंदीकरणासाठी २००१-०२ मध्ये संपादित केलेल्या घरांच्या पुनर्वसनासाठी तब्बल २५ वर्षे संघर्ष करणाऱ्या १९ कुटुंबांची प्रतीक्षा अखेर संपली. दीर्घकाळ प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर या लाभार्थ्यांना नव्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कुटुंबांना चाव्यांचे वाटप करण्यात आले.

शहरातील हाजूरी येथील रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी १९ कुटुंबांची घरे संपादित करण्यात आली होती. त्यावेळी पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले असले, तरी विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडत गेली. परिणामी, या कुटुंबांना अनेक वर्षे भाड्याच्या घरांमध्ये अथवा तात्पुरत्या निवासस्थानी राहावे लागले. पुनर्वसनासाठी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान, अनेक वेळा निवेदने देण्यात आली, बैठका झाल्या; मात्र प्रश्न आतापर्यंत मार्गी लागला नव्हता. गेल्या काही वर्षांत या प्रकरणाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

संबंधित विभागांशी समन्वय साधून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि २५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण अखेर मार्गी लागले. यासंदर्भात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १९ लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त

याबाबत बोलताना, रस्ता रुंदीकरणासाठी घरे दिल्यानंतर पुनर्वसन लवकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागली. अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने हक्काचे घर मिळेल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर घराच्या चाव्या मिळाल्याने मोठे समाधान मिळाल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. या पुनर्वसनामुळे १९ कुटुंबांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला घराचा प्रश्न निकाली निघाला आहे.