पंधरवडय़ाची पाणीकपात, जांभूळ येथील प्रक्रिया केंद्रात दुरुस्तीचे काम
अंबरनाथ : ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या महापालिकांना पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र शुक्रवारी बंद असल्याने या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाटंबधारे विभागाच्या जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बारवी धरणातून २४ तास पाणी बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी निम्म्या जिल्ह्यात पाणीपुरवठा बंद असेल.
उपलब्ध पाणीसाठय़ाचे १५ जुलैपर्यंत व्यवस्थापन करण्यासाठी जानेवारी महिन्यात दर १५पंधरा दिवसांनी एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दर पंधरा दिवसांनी बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतो. शुक्रवारी अशाच प्रकारे पंधरवडय़ाची पाणीकपात आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणी बंद राहील. त्यामुळे शुक्रवारी निम्मा जिल्हा पाण्याविना असेल. अंबरनाथच्या जांभूळ येथील जल शुद्धीकरण केंद्रात या काळात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि पनवेल या शहरांना आणि ठाणे टीटीसी, वागळे इस्टेट यांसह जिल्ह्यातल्या बहुतांश औद्योगिक क्षेत्रांचा पाणीपुरवठा बंद राहील. तर शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
