लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : दिव्यांग असल्याचा जाब विचारल्याने दोन रेल्वे प्रवाशांनी दिव्यांगालाच मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा भागात ३८ वर्षीय दिव्यांग राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आजीचा मृत्यू झाल्याने ते नांदेड येथे गेले होते. १५ जूनला त्यांनी मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला होता. ते राज्यराणी या एक्स्प्रेस रेल्वेगाडीमधील दिव्यांगाच्या डब्यामधून प्रवास करत होते. १६ जून या दिवशी मध्यरात्री रेल्वेगाडी मानवत रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी काही प्रवासी दिव्यांगाच्या डब्यामध्ये चढले. यातील दोन प्रवासी दिव्यांग तरुण झोपलेल्या खालील आसनावर येऊन बसले. त्यामुळे दिव्यांग तरुणाने त्यांना तुम्ही दिव्यांग आहात का? असा जाब विचारला.

आणखी वाचा-कल्याणमध्ये मजुराने स्वत:वर चाकूने वार करून जीवन संपविले

त्यानंतर संतापलेल्या त्या दोन प्रवाशांनी त्यांच्या डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांनी तात्काळ रेल्वेगाडीतील साखळी खेचली. काहीवेळानंतर रेल्वेगाडीतील रेल्वे सुरक्षा रक्षक विभागाचे कर्मचारी तेथे आले. त्यांनी दोन्ही प्रवाशांना पकडले. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी छत्रपती संभाजीनगर स्थानकात आली असता, यातील एक प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन निघून गेला.

दिव्यांग तरुण ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याने याप्रकरणी मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याआधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.