कल्याणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सकाळ, संध्याकाळ बाजारात, फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना एकट्या हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी वरून हे चोर दिवसाढवळ्या शहरात फिरतात तरी ते पोलिसांना का दिसत नाहीत असे संतप्त प्रश्न महिला तक्रारदारांकडून उपस्थित केले जात आहेत.

दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील टिळक रस्ता भागातील गांधी चौकात एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे महिलांकडून दाखल आहेत.

दुचाकीवरून येणारे दोन दुचाकी स्वार महिला रस्त्याने जात असताना अचानक अंगावर दुचाकी आणतात. महिलेला आपला अपघात होतो की काय या भीतीने ती बाजुला होते. तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेला इसम महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र जोराने हिसकावतो. ते तुटत नाही तोपर्यंत तो हिसके देत राहतो. या कालावधीत महिलेच्या मानेला जोराने हिसका बसत असल्याने मानेजवळ अनेक वेळा जखम होते, असे महिलांनी सांगितले.

पोलिसांचा वचक राहिला नाही की अशा घटना वाढीस लागतात अशी चर्चा शहरात सुरू आहे. कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी शंकर मंदिरा शेजारी राहणाऱ्या राजश्री रमाकांत अग्रवाल (६९) या ज्येष्ठ नागरिक महिला धोब्याच्या दुकानात इस्त्रीसाठी दिलेले कपडे आणण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत चालल्या होत्या. कपडे घेऊन परत येत असताना शिवमंदिराजवळ दोन दुचाकी स्वार अचानक वेगाने राजश्री अग्रवाल यांच्या अंगावर आले. घाबरून त्या बाजुला झाल्या. हातात कपडे असल्याने स्वताला सावरत असताना दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने राजश्रीच्या गळ्याला हात लावून गळ्यातील सोनसाखळी जोराने हिसकली. राजश्री यांनी सोनसाखळी एका हाताने दाबून ठेवली. चोरट्याने जोर लावल्याने ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तुटून चोरट्याच्या हातात गेली. काही कळण्याच्या आत ते वेगाने पळून गेले, असे राजश्री यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कल्याण शहर परिसरातील बेकायदा बांधकामे, झोपड्या, आंबिवली भागातील इराणी वस्तीत लपून बसण्यास जागा असल्याने चोरटे दिवसा, रात्री चोरी करून निवांतपणे या भागात राहतात. चोरांपासून जीविताला धोका म्हणून आजुबाजुचे रहिवासी या विषयी उघडपणे बोलत नाहीत, असे काही जाणकारांनी सांगितले. हॅप्पी स्ट्रीट सारखे कार्यक्रम करून सामाजिक सलोखा वाढीस लागत असला तरी दररोज कल्याण, डोंबिवली शहर परिसरात होणाऱ्या पाच ते सहा चोरी, लुटमारीच्या घटनांचा बंदोबस्त कोण करणार असे प्रश्न जाणकार नागरिक उपस्थित करत आहेत.