कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रखडलेली विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात आपण पुढाकार घेणार आहोत. त्याच बरोबर शहरातील नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन आरोग्य विभाग पूर्ण सक्षतेने काम करील यादृष्टीने लक्ष देणार आहे, असे नवनिर्वाचित महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांना सांगितले. मागील पाच वर्षाच्या कालावधीत आपण नगरसेविका होते. या कालावधीत आपणास शहरातील विविध विकासाचे प्रश्न, नागरी समस्या यांची जाण आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर आपला भर असेल, असे महापौर हर्षाली चौधरी यांनी सांगितले.
‘मागील सहा वर्षाच्या कालावधीत पालिकेत प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत स्मार्ट सिटी आणि शहर विकासाचे अनेक प्रकल्प शहरात सुरू आहेत. हे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण झाले पाहिजेत याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देऊ. टिटवाळा ते माणकोली, काटई बाह्यवळण रस्ता, कल्याण, डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न, आरोग्याचे विषय हे महत्वाचे प्रश्न आणि नागरिकांच्या गरजा ओळखून कोणते प्रकल्प हाती घ्यावेत, याचा विचार करून युती म्हणून सर्व पक्षीय नगरसेवकांचा विचार घेऊन शहर विकासाचे चांगले प्रकल्प मार्गी लावण्याला प्राधान्य देऊ,’ असे उपमहापौर राहुल दामले यांनी सांगितले.
मल्लेश शेट्टी भडकले यापूर्वी प्रत्येक महासभेत नेहमीच आक्रमक शैलीत आणि चढ्या आवाजात बोलण्याची शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी आपली परंपरा पहिल्याच महापौर निवडीच्या सभेतही कायम ठेवली. महापौर निवडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर व्यासपीठावर आयुक्त म्हणून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे बसले होते. बाजुला महापौर हर्षला चौधरी-थविल, उपमहापौर राहुल दामले आणि सचिव किशोर शेळके बसले होते. सभागृहातील अधिकारावरून अनपौचारिक चर्चा सभागृहात सुरू असताना अतिरिक्त आयुक्त गोडसे काही शब्द बोलून गेले. तो शब्द पकडून शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी अतिरिक्त आयुक्त गोडसे यांच्यावर भडकले. सचिव हे सभागृहातील नगरसेवकांचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांना इतर कोणी शिकवू नये. सचिवांना आदेश देण्याचा अधिकार फक्त महापौरांचा आहे.
तो अधिकाऱ्यांचा नाही. अधिकाऱ्यांनी शांत बसावे. तुम्हा अधिकाऱ्यांना जाम माज आला आहे. सभागृहात गप्प बसा, अन्यथा सरळ बाहेरचा रस्ता धरावा, असे बोलून पहिल्याच महासभेत नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी अधिकाऱ्यांंवरील आपला राग व्यक्त केला. आणि आपली सभागृहातील आक्रमक आणि भडकण्याची परंपरा कायम ठेवली. ठाकरे गटाची कबड्डी टीम महापौर निवडीच्यावेळी सभागृहात नेहमीच उपरोधिक आणि कोपरखळ्या मारून बोलण्यात पटाईत असलेले शिवसेना नगरसेवक सचिन पोटे यांनी ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांना उद्देशून एक कोपरखळी मारली आणि सभागृहात हशा पिकला. ‘ठाकरे गटाचे नगरसेवक निवडून आले तेव्हा एक क्रिकेटची टीम होती. पण सभागृहात येईपर्यंत तुमची कबड्डीची टीम झाली आहे’, अशा शब्दात सचिन पोटे यांंनी बोरगावकर यांना डिवचले.
प्रतिक्रिया राज्यात लाडक्या बहिणींचे राज्य ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेची धुरा लाडक्या बहिणींच्या हाती देण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. या महापालिकांंमधील महापौर पदाचे आरक्षण महिला, पुरूषांसाठी असताना लाडक्या बहिणींना या पदासाठी पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यात आता लाडक्या बहिणींचे राज्य आले आहे. या सर्व लाडक्या बहिणी सक्षमतेने कारभार करतील असा विश्वास आहे. डाॅ. श्रीकांत शिंदे

