कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका महापौरपदी शिवसेनेच्या ॲड. हर्षली चौधरी-थविल, उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी शुक्रवारी कल्याण डोंबिवली पालिकेचे सचिव किशोर शेळके यांच्याकडे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांमुळे कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असल्याचे स्पष्ट झाले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, मनसेचे राजू पाटील, भाजपचे नेते दीपेश म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी शहराध्यक्ष वरूण पाटील, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नीलेश शिंदे उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.

कुजबुजीला पूर्णविराम

महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी पहिला आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे या पदावर शिवसेना शिंदे गटातून ॲड. हर्षाली चौधरी-थविल की नगरसेवक किरण भांगले, शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या शीतल मंढारी पण उमेदवारी अर्ज दाखल करतील का, अशी उलटसुलट चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. कल्याण शहरातील शिवसेना शिंदे गटावर पकड असलेला शिवसेनेचा एका स्थानिक पदाधिकारी किरण भांगले यांचे नाव शिवसेना नेत्यांसमोर महापौर पदासाठी पुढे करत होता. पण या पदाधिकाऱ्याचे आणि खासदारांमध्ये विळ्याभोपळ्याचे नाते असल्याने या पदाधिकाऱ्याचे किती ऐकले जाईल अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. अखेर त्या खऱ्या ठरल्या. आणि उच्चशिक्षित वकील असणाऱ्या, नगरसेवक पदाचा अनुभव असणाऱ्या ॲड. हर्षाली थविल यांचे नाव शिवसेनेने महापौर पदासाठी गुरूवारी रात्रीच नक्की केले. भांगले यांचे नाव पुढे करणारा पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी पहिल्या फळीच्या नेत्यांमधून गायब होता. अशाप्रकारे मागे राहून या पदाधिकाऱ्याने आपली नाराजी उघड केली असल्याची पालिकेत चर्चा आहे.

दामलेंची इच्छा पूर्ण

यापूर्वीचे महापौर पदाचे आरक्षण खुल्यासाठी राखीव होते. त्यामुळे तेच आरक्षण कायम राहिले आणि भाजपचे संख्याबळ आणि जोडतोड करून भाजपचे राहुल दामले, दीपेश म्हात्रे यांंनी महापौर पदासाठी जोरदार तयारी केली होती. नव्याने महापौर पदासाठी आरक्षण पडले. हे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव पडले. या प्रवर्गातील एकही उमदेवार भाजपकडे नव्हता. त्यामुळे भाजच्या महापौर पदासाठीच्या उमेदवारांचा हिरमोड झाला. शिवसेनेकडे या प्रवर्गातील दोन, मनसेकडे एक उमेदवार होता. शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ अधिक असल्याने युतीधर्माप्रमाणे महापौर पदी शिवसेनेचा, उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार देण्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निश्चित केले. महापौर, उपमहापौर पदासाठी विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने येत्या ३ फेब्रुवारी या दोन्ही पदावरील निवड बिनविरोध होणार आहे.

युतीकडून महापौर पदासाठी ॲड. हर्षाली थविल, उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रतिस्पर्धी एकही उमेदवार नसल्याने या निवडी बिनविरोध होतील. शिवसेना, भाजप युतीला पालिकेत मनसेने साथ दिली आहे. त्यामुळे पालिकेतील महायुतीची ताकद वाढली आहे. या ताकदीवर विकासाचा रथ पुढे नेला जाईल. – डाॅ. श्रीकांत शिंदे खासदार.