फेरीवाल्यांची मुजोरी कायम; घोडबंदर भागात पालिकेच्या पथकावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.

hawkers police
(प्रातिनिधिक फोटो)

ठाणे : महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. मात्र तरीही फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटजवळील परिसरात तीन दिवसांपूर्वी एका फेरीवाल्याने पालिकेच्या पथकावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. आधी बोटे छाटली होती, आता मानच छाटू, अशी धमकी फेरीवाल्याकडून देण्यात आली. पथकातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखविल्यामुळे हा फेरीवाला नरमल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी या मोहिमेदरम्यान कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता िपपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरील्याने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात िपपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाची बोटे छाटली गेली होती. या घटनेनंतर संताप व्यक्त होऊ लागताच पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली. या मोहिमेनंतरही फेरीवाले पदपथ आणि रस्त्यांवर ठाण मांडत आहेत.

घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटजवळील परिसरात रस्त्यावर फेरीवाले बसत असून महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या बंगल्याच्या पाठीमागचा हा परिसर आहे. पालिकेचे पथक तीन दिवसांपूर्वी या भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. पथकाकडून कारवाई सुरू असतानाच तिथे नारळ विकणाऱ्या एका फेरीवाल्याने पथकावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला. साहाय्यक आयुक्तांची बोटेच छाटली होती, आता तुमची मानच छाटू, असे फेरीवाल्याने चाकू दाखवत पथकाला धमकावले. त्याच्या धमक्यांनंतरही दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच फेरीवाल्याने शरण येत चाकू खाली ठेवून दिला. यामुळे मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वी मानपाडय़ात एका फेरीवाल्याने पथकातील कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली होती. असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वृद्ध लिपिकाला त्रास

फेरीवाल्याने चाकू काढून पथकाला धमकावले, त्या वेळेस पथकामध्ये एक वृद्ध लिपीक होते. हा सर्व प्रकार पाहून ते घाबरले आणि त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी धीर देत या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते तक्रार दाखल करू शकले नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत ते तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

घोडबंदर भागात फेरीवाल्यांकडून चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बाब समजली आणि त्यानंतर याबाबत सर्वसाधारण सभेत विचारणाही केली. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. असे प्रकार टाळण्यासाठी फेरीवाला धोरण लवकर राबविणे गरजेचे आहे.

मनोहर डुंबरे, भाजप गटनेता, महापालिका

घोडबंदर परिसरात एका फेरीवाल्याने पालिकेच्या पथकावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना पथकाला दिल्या आहेत.

अश्विनी वाघमळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठामपा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hawker tried to attack with knife on thane municipal squad at hiranandani estate zws

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या