ठाणे स्थानक परिसरात पुन्हा बस्तान

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येणारी कारवाई जशी थंड होऊ लागली तसे शहरातील वेगवेगळ्या भागात फेरीवाल्यांचे बस्तान पुन्हा बसू लागले आहे. गेले काही आठवडे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेतर्फे कारवाईचे पथक संथ झाल्याने स्थानक परिसरात सोमवारी सकाळी फेरीवाल्यांची गर्दी कायम होती. रिक्षाचालकही मुख्य रिक्षा स्थानकाची जागा सोडून स्थानकाबाहेरच सर्रासपणे प्रवाशांना भाडे विचारताना दिसून आल्याने आयुक्तांच्या कारवाईला फेरीवाले आणि रिक्षाचालक यांनी जुमानले नसल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईचे कोणतेही भय नसलेल्या फेरीवाल्यांनी इंदिरानगर परिसरात आठवडा बाजारही पुन्हा भरवला होता.

महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र कारवाई पथकाची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा रस्त्यांवर पथारी मांडत असल्याचे दिसत आहे. काही दिवस स्थानक परिसरातील फेरीवाले आणि रिक्षाचालकांवर वचक बसवण्यासाठी महापालिका आयुक्त कारवाई पथकासोबत दररोज सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात फेऱ्या मारत होते. मात्र आता आयुक्तांची सायंकाळची कारवाई थांबल्यानंतर आता फेरीवाले आणि रिक्षाचालकांनी मोकाटपणे रेल्वे स्थानक परिसर अडवला आहे. फळविक्रेते, खेळणी विक्रेते, फळांचा रस विकणारे फेरीवाले यांनी रेल्वे स्थानक परिसर सोमवारी पुन्हा गजबजलेला होता. फलाट क्रमांक दोनमधून बाहेर पडल्यावर सॅटिस पुलाखाली या फेरीवाल्यांची गर्दी अलीकडे कायम असते.

पादचारी पूलही काबीज

वर्तकनगर, देवदयानगर येथील रस्ता रुंदीकरणामुळे फेरीवाल्यांनी पोबारा केला असून याच रस्त्यावरील पादचारी पुलावर फेरीवाल्यांनी आपल्या विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या या पुलावरून ये-जा करणे पादचाऱ्यांना कठीण होत आहे, अशी तक्रार येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर साबळे यांनी केली.

रिक्षाचालकांची मनमानी कायम

लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, नितीन कंपनी या ठिकाणी जाण्याऱ्या शेअर रिक्षांचा स्वतंत्र रिक्षा थांबा असला तरी रेल्वे स्थानकाबाहेर पडलेल्या प्रवाशांजवळ धावत जाऊन भाडे विचारण्याचे रिक्षाचालकांचे बेताल वर्तन अद्याप सुरू आहे. रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रिक्षा रस्त्यावर बिनदिक्कतपणे उभ्या करण्यात येत असल्याने सकाळच्या वेळी रेल्वे स्थानकाबाहेरील प्रचंड गर्दीतून प्रवास करताना मन:स्ताप होत असल्याचे काही महिला प्रवाशांनी सांगितले.