कल्याण पश्चिम विभागातील विकास आराखडय़ानुसार फेरीवाल्यांसाठीच्या आरक्षित भूखंडावर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याची मागणी बैलबाजार प्रभागाच्या नगरसेवकाने आयुक्तांकडे केली आहे. यासाठी जमीन मालकाला ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) द्यावा लागणार असून, असे झाल्यास रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, असे नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सांगितले.

बैलबाजारातील सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ फेरीवाल्यांसाठी जागा नावाचा मंजूर विकास आराखडय़ात (आरक्षण क्र. ११२) भूखंड आहे. हा भूखंड जमीन मालकाकडून पालिकेने ताब्यात घेतला व जमीन मालकाला जमिनीचा मोबदला दिला, तर फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी ठिकाण निर्माण होईल. फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाल्याने ते रेल्वे स्थानकाकडे फिरकणार नाहीत, असे पेणकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांजवळील फेरीवाले हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. गेल्या वीस वर्षांपासून रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याकडेच्या, पदपथावरील जागांवर कब्जा करून ठेवलेले फेरीवाले, कारवाई होऊनही जागा सोडण्यास अद्याप तयार नाहीत. पालिकेचे फेरीवाला हटाव पथक आले की, तेवढय़ा पुरते फेरीवाले दुकान, इमारतींच्या आडोशाला लपून बसतात आणि पथक तेथून गेले की, पुन्हा रस्ते, पदपथावर येतात. फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा हा व्यवसाय असल्याने ते कारवाई होऊनही रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत. या फेरीवाल्यांना त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या हक्काच्या जागेत स्थलांतरित केले तर, हे फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करण्यासाठी येणार नाहीत, असे नगरसेवक पेणकर यांनी आयुक्तांना सुचविले आहे.

आयुक्तांनी भूखंडाची पाहणी करून याबाबत तातडीने काही कार्यवाही करता येईल का, यादृष्टीने पावले टाकण्याचे आश्वासन पेणकर यांना दिले आहे.

नाल्यांवर वाहनतळ

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ वाहनांनी भरलेला असतो. या ठिकाणी नव्याने वाहने ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे पालिकेने झुंझारराव बाजार, लक्ष्मी बाजाराजवळून वाहत असलेल्या नाल्यावर सीमेंटचा कोबा टाकून, ही जागा दुचाकी वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध करून दिली तर, पालिकेला महसुलाचा एक नवीन स्रोत उपलब्ध होईल, अशी सूचना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी प्रशासनाला केली आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. परंतु, त्याची दखल घेण्यात येत नव्हती. आयुक्त ई. रवींद्रन विकासकामे मार्गी लावण्याच्या प्रयत्नात असल्याने, ते हे प्रकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवतील, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.