अंबरनाथः अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. शनिवार आणि रविवार दोन दोन केंद्र बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  मागच्या  दरवाजाला तोडत आत प्रवेश करून डॉक्टरांचे रूग्ण तपासणी साहित्यासह सुमारे १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यापूर्वी मे २०२१ मध्ये येथून लशींची चोरी झाली  होती.

अंबरनाथ तालुक्यातील  मांगरूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.  हे केंद्र  शनिवार  आणि रविवार  दोन दिवस बंद होते. सोमवारी  जेव्हा हे केंद्र  उघडले त्यावेळी या केंद्रातील काही साहित्य येथील डॉक्टरांना दिसले नाही. यात स्टेथस्कोप, रक्तदाब तपासणी यंत्र, प्रिंटर, हब कटर, कात्री,  वजन काटा, लोखंडी स्टूल आणि इन्व्हर्टर  बॅटरी अशा १४ हजार  ५०० रूपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. आसपास शोधाशोध केल्यानंतरही साहित्य न मिळाल्याने हे साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट  झाले. त्यानंतर येथील डॉक्टर मनोज  प्रकाश भिसे यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याच्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. यापूर्वीही मांगरूळच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातून लशींची चोरी झाली होती. गेल्या वर्षात मे महिन्यात ज्यावेळी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी येथून इतर आजारांच्या लशी चोरल्या गेल्या होत्या. त्यानंतरचा हा दोन वर्षातला दुसरा प्रकार आहे.