उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका प्रशासन केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेली कर्करोगाच्या विविध प्रकारच्या रूग्णांच्या माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या पाहणीत उघड झाले आहे. मंगळवारी उल्हासनगरात रूग्णालयाच्या पाहणीसाठी आलेल्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने अपुरे आकडे मांडले. डेंग्यु, मलेरियासह सर्रास आढळणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांचे आकडे एकेरी दाखवण्यात आले. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही अशा आकडेवारीमुळे रूग्णांना मिळणाऱ्या सुविधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे आरोग्य सुविधांबाबत पालिकेची अनास्थाही उघड झाली.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मंगळवारी उल्हासनगर शहरात आले होते. यावेळी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा मंत्र्यांना देण्यात आला. मात्र या सादरीकरणातील आकडे पाहून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चक्रावले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने कर्करोग निर्मुलनासाठी आवश्यक आकडेवारी संकलित करून त्यानुसार रूग्णांना सुविधा देत असते. त्यामुळे कर्करोगाच्या विविध प्रकारच्या रूग्णांची माहिती संकलित केली जाते. मात्र उल्हासनगर महापालिकेने दिलेल्या कर्करोग रूग्णांच्या माहितीमुळे संशयास्पद घट दिसून आली. अनेक प्रकारातील रूग्णांचे एकेरी आकडे मांडण्यात आले होते. तर डेंग्यु मलेरियासारख्या आजारांचे रूग्णकही दुहेरी आकड्यात होते. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना संशय वाटल्याने त्यांनी या आकड्यांवर संशय व्यक्त केला, अशी खात्रीलायक माहिती महापालिका सुत्रांनी दिली आहे.

इतके कमी आकडे कसे असू शकतात, तुमच्या सर्वेक्षणात दोष असावा असेही त्यांनी सांगितले. तर कर्करोगाच्या रूग्णांची माहिती खासगी रूग्णालयातूनही मिळवायची असते. अशी माहिती न मिळाल्याने अशा रूग्णांना रूग्णालय, उपचार केंद्र उभारण्यात अडचणी येऊ शकतात. माहितीच नसेल तर त्यांच्यासाठी सुविधा कशा उभारणार असा संतप्त सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

या अचानक आलेल्या प्रश्नांने उल्हासनगर महापालिका प्रशासन प्रमुखांची भंबेरी उडाली. त्यांनी सुरूवातीला गोल गोल उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर मध्यंतरीच्या काळात याकडे दुर्लक्ष झाल्याचे कबूल केले. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी यापुढील बैठकीत हे सर्व आकडे अद्ययावत असावेत, असा सज्जड दम अधिकाऱ्यांना भरला. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे चेहरे पडले. या सर्व प्रकाराला पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी

या दौऱ्यात उल्हासनगर शहरातील बोगस डॉक्टरांचा प्रश्नही चर्चेला आला. या डॉक्टरांचे सर्वेक्षण करून कारवाई सुरूच ठेवा, असे आरोग्यमंत्र्यांनी बजावले. तर खासदारांनीही कारवाई सातत्याने सुरू राहावी असे सांगितले.

इतर रूग्णांचीही संख्या कमी

या सादरीकरणात उल्हासनगर महापालिकेने डेंग्यु, मलेरिया, टायफॉईड यासारख्या आजारांचेही आकडे कमी दाखवले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात इतके कमी रूग्ण असूच शकत नाही, असेही त्यांनी सुनावले. अशा रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून बरे करायला हवे, जेणेकरून या रूग्णांचा भार मध्यवर्ती रूग्णालयावर येणार नाही, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुचवले. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिली.