ठाणे – जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यातील उर्वरित कामे देखील जलदगतीने पूर्णत्वास नेऊन रुग्णालय नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावे. यासाठी सर्व यंत्रणानी एकत्रितरित्या काम करावे, अशा सूचना यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच या रुग्णालयाला लागणाऱ्या स्वतंत्र वीजपुरवठा करणारी यंत्रणेचे काम धीम्या गतीने सुरु असल्याबाबत यावेळी मंत्री आबिटकर यांनी नाराजी व्यक्त करत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना ही केल्या.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांना सूचना केल्या.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक वर्षांपासून ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचे आरोग्य केंद्र ठरत आहे. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात कार्यरत असलेल्या या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असत. मात्र, कालांतराने इमारतीचे बांधकाम जुने झाल्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम सुरू असताना रुग्णसेवा खंडित होऊ नये म्हणून रुग्णालय सध्या तात्पुरत्या स्वरूपात ठाणे मनोरुग्णालयाजवळ हलविण्यात आले आहे. येथे देखील ठाणे, रायगड तसेच इतर जिल्ह्यांमधील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत.

दरम्यान, कोर्टनाका परिसरातील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला वेग आला असून हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभे राहत आहे. नव्या आराखड्यानुसार येथे ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय अशा एकूण ९०० खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या या बांधकामातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून अंतर्गत विद्युतीकरण आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून, नवीन रुग्णालय सुरु झाल्यानंतर आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे. या ९०० खाटांच्या या रुग्णालयासाठी तब्बल १०७८ नवीन पदांची भरती केली जाणार असून, त्यामुळे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता दोन्ही लक्षणीयरीत्या वाढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या कामाची पाहणी करत हे सर्व काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तर वीज पुरवठा सुरळीत व्हाव्यात यासाठी तातडीने तजवीज करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे. – डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक