गारव्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव; सर्पमित्रांमुळे नवसंजीवनी

वाढत्या उन्हाचा परिणाम सापांवरही होत आहे. उन्हाच्या काहिलीने साप असहय़ झाले असून थंडाव्याच्या शोधात नागरी वस्तीत ते शिरकाव करत असल्याचे चित्र आहे. सर्पमित्रांच्या जागरूकतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मानवी वस्तीत शिरणाऱ्या सापांना नवसंजीवनी मिळत आहे.

सकाळी नऊनंतर हळूहळू तापमान वाढत जाते आणि उन्हाच्या दाहकतेमुळे त्रासलेले साप थंडाव्याचा शोध घ्यायला लागतात. थंडाव्याच्या ठिकाणी बेडूक, कीटक, पक्ष्यांची अंडी सहज उपलब्ध होतात. यामुळे वसई-विरारमध्ये मानवी वस्तीत या दिवसांत मोठय़ा प्रमाणावर साप निदर्शनास आले आहेत. सिमेंट-काँक्रीटच्या जंगलामुळे वन्यजीवांबरोबर सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. खाडीकिनारी अथवा उद्यान परिसरात झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे उन्हाळ्यात हे साप नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. गेल्या महिन्याभरात वसईत धामण, पानधिवड, नाग, कोब्रा, हरणटोळ, घोणस, मण्यार, नागीण, अजगर अशा सुमारे ६०हून अधिक सापांना अग्निशमन दलाने आणि सर्पमित्रांनी पकडून जीवनदान दिल्याचे वसई अग्निशमन दल आणि सर्पमित्रांकडून सांगण्यात आले. सध्या नाग आणि धामण या सापांचा मिलनाचा हंगाम असून बऱ्याचदा हे साप जोडीने फिरतानाही दिसत आहेत.

सापांना २८ ते ३४ अंश तापमान अनुकूल असते, परंतु आता ते ४२ अंशापर्यंत पोहोचत असल्याने या वाढत्या तापमानामुळे झाडी-झुडपांतील गारव्यात राहण्यासाठी हे साप बाहेर पडू लागले आहेत. आढळून आलेल्या सापांमध्ये नागांचे प्रमाण जास्त आहे. मण्यार, घोणस या अतिविषारी सापांनंतर नागाचे विष जालीम समजले जाते. उन्हाचा चटका सहन न होऊन मानवी वस्त्यांमध्ये येत आहे.

– निनाद राऊत, सर्पमित्र