पहिल्याच पावसात त्रेधातिरपीट

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज वितरण व्यवस्थाही कोलमडली असून काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यातील रस्त्यांवर पाणी साचले, विजेचाही गोंधळ;
नालेसफाईचा बोजवारा; महापालिका प्रशासनाचा फोलपणा उघड
गेल्या तीन दिवसांपासून वसई-विरार शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरवासीय सुखावले असले तरी महापालिका प्रशासनाचा फोलपणा या पहिल्या पावसात उघड झाला आहे. वसईतील अनेक भागांत पाणी साचले आहे, तर पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. महापालिकेने शहरात शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता, मात्र या पावसाने त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दाखवून दिले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज वितरण व्यवस्थाही कोलमडली असून काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.
बस डेपोचे तळय़ात रूपांतर
दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई पश्चिमेच्या बस स्थानकात पाणी साचले आहे. त्याचा फटका प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बसला. सातिवली, कामण, वसई फाटा या ठिकाणांहून विद्यार्थी बसने वसई येथे येतात. कामगार वर्गही मोठय़ा प्रमाणावर बसने प्रवास करतो. बस स्थानकातून पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत त्यांना जावे लागत आहे, तसेच या ठिकाणी असलेल्या खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना त्याचा अंदाज येत नाही आणि ते खड्डय़ात पडण्याचे प्रकारही घडत आहेत. नालासोपारा पश्चिमेचा बस डेपोमध्येही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे.
वालीवमध्ये ४० तास वीज नाही
वसईतील भुईगाव, नाळे, पापडी, सागरशेत, वालीव क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पूर्ण केल्याचा वीज कंपनीने दावा केला होता, परंतु हा दावा पहिल्या पावसातच फोल ठरला आहे. वसई पूर्वेच्या वालीव या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सलग ४० तास बत्ती गुल आहे. त्याचा फटका कारखानदारांसह सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. विजेअभावी तीन दिवसांपासून ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहे. परंतु वीज वितरण कंपनीकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर वसई गावातील सागरशेत येथे शनिवारी दुपारी मुळासकट झाड कोसळल्याने या ठिकाणी २४ तास वीज नव्हती.

रस्ता वाहून गेला
विरार रेल्वे स्थानकाजवळील रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. हाच रस्ता सबवेजवळ खचला असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने सॅटेलाइट सिटी अंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी टाकलेल्या पाइपलाइनमुळे रस्ते खचल्याने वाहतुकीचे बारा वाजले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

गावराईपाडा जलमय
पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा किती खोटा होता हे जागोजागी तुंबलेल्या पाण्यामुळे दिसून आले आहे. येथील भोईरपाडा पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. काही लोकांच्या घरात तर तब्बल एक फुटांहून अधिक पाणी शिरले होते. सांडपाण्याच्या नाल्यातील पाणी त्यात मिसळल्याने दरुगधी पसरली असून काही लोकांनी रोगराईची भीती व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rainfall paralyses vasai virar nalasopara