कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेले सीमेंट काँक्रीटचे रस्ते आणि मेट्रोच्या कल्याण शहरात सुरू असलेल्या कामांमुळे मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबण्यास सुरूवात झाली आहे. काँक्रीट कामांच्या ठिकाणी अनेक ठिकाणी गटारांची कामे पूर्ण झाली नाहीत. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणची गटारांची छिद्रे माती, चिखलाने बुजली आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला की या कामांच्या ठिकाणी रस्तोरस्ती पाणी तुंबल्याचे चित्र आहे.
कल्याण शहरात शिवाजी चौक, गुरूदेव हाॅटेल ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दीड फूट उंचीची गटारे आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोची कामे सुरू आहेत. दोन्ही बाजुच्या गटारांची छिद्रे चिखल, माती, गाळाने भरून गेली आहेत. मुसळधार पाऊस पडला की गुरूदेव हाॅटेल ते जय मल्हार हाॅटेल ते शिवाजी चौक रस्त्याच्या दरम्यानचा रस्ता दीड फूट पाण्याखाली जातो. बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस पडल्यानंतर हा रस्ता जलमय झाला होता.
दुचाकी वाहने या पाण्यात अडकून बंद पडत होती. हे पाणी वाहून जाण्यास मार्गिका नसल्याने वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागत होते. डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्ता भागात श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. याठिकाणी एक फूट उंचीची गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु, रस्ते काम अद्याप सुूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला की सखल असलेल्या या भागात पाणी तुंबते. सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरील वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागते.
अशीच परिस्थिती डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर, विजयनगर मैदानाजवळील परिसरातील रस्त्यांवर, महात्मा फुले रस्ता, डोंबिवली पूर्वेतील काँक्रीट रस्ते कामे सुरू असलेल्या नेहरू मैदान भागात पाहण्यास मिळते. एमआयडीसीत काँक्रीटची कामे पू्र्ण झाली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याने पाऊस सुरू झाला की त्या भागात पाणी तुंबत आहे. डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानक भागात नेहरू रस्त्यावर, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, डाॅ. राॅथ रस्ता भागात मुसळधार पाऊस सुरू झाला की पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
पावसाची सुरूवात असताना कामे सुरू असलेल्या ठिकाणी रस्ते जलमय होत आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर रस्ते जलमय होणाऱ्या भागातील रहिवाशांनी प्रवास कसा करायचा. याठिकाणी पालिकेची पर्यायी व्यवस्था काय आहे, असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ३१ मे नंतर कोणत्याही प्रकारचे रस्ते खोदकाम, रस्ते काम करण्यास मनाई आहे. परंतु कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात पावसाळ्यातही ही कामे सुरू असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.