कोंडीवर उपाय; रस्त्यांच्या देखरेखीसाठी कृतिदल

ठाणे : जिल्ह्यातील शहरांमधील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्तेदुरुस्ती होईपर्यंत शहरांमध्ये दिवसा अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचा आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिला. त्यामुळे अवजड वाहनांची ये-जा केवळ रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सुरू राहील. 

वाहतूककोंडीबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचे कृतिदल स्थापन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. रस्त्यावर खड्डे पडल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार कृतिदलाला देण्यात आले आहेत. येत्या आठवड्याभरात खड्डे बुजविण्याच्या सूचना देत दोषी अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे ३० हजार अवजड वाहने ठाणे शहरातील मुंबई-नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळणमार्गे जा-ये करतात. शहरातून दुपारी १२ ते ४ या वेळेत या वाहतुकीस परवानगी आहे; परंतु ही वाहतूक दिवसभर सुरू असते. यामुळे कोंडीत भर पडत आहे. ही बाब बैठकीत पुढे आल्यानंतर ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये रस्तेदुरुस्ती होईपर्यंत दिवसा अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय पालकमंत्री शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता अवजड वाहनांची वाहतूक केवळ रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सुरू राहणार आहे. 

या बैठकीला ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते, तर रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलीस अधीक्षक, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फर्रंन्सगद्वारे सहभागी झाले होते.

कृतिदलाची स्थापना

कृतिदलामध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) तसेच ठाण्याचे अधीक्षक अभियंता, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय या यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे, तसेच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या कृतिदलास असतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शहरांच्या सीमांवर वाहतूक नियमन

ठाणे शहराशी संबंधित नसलेली अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या सीमांवर वाहनतळाची व्यवस्था करून अवजड वाहनांचे नियमन करण्याचे तसेच शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

रस्त्यांची बांधणी चांगल्या दर्जाची नसते, त्यामुळे त्यांची दूरवस्था होते. यापुढे अवजड वाहतुकीचा विचार करून रस्त्यांची कामे केली जातील. रस्ते बांधणीदरम्यान साहित्य परीक्षणही करण्यात येईल. – एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे