‘एमएमआरडीए’कडून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीन हात नाका उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. या कामामुळे गुरुवारी तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहतूक कोंडी झाली. दुपारी दोननंतरही वाहतूककोंडी कायम होती. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास लागत होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. २३ मेपर्यंत हे काम असेच सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी काही दिवस वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे, घोडबंदर, भिवंडी तसेच नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पूर्व द्रुतगती मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक ये-जा करतात. सध्या कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्य शासनाने मुभा दिलेल्या बँका आणि इतर आस्थापनामधील कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनाने पूर्व द्रुतगती मार्गे मुंबईतील कार्यालयापर्यंत प्रवास करीत आहेत. असे असतानाच या मार्गावरील तीन हात नाका उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सांधे दुरुस्तीचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाखालील मार्गावरून सोडले जात आहे. मात्र उड्डाणपुलाखालील मार्गिका वाहनसंख्येच्या तुलनेत अपुरी आहे. याचा परिणाम गुरुवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना सहन करावा लागला. सकाळी आठ वाजेपासून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी होत असल्याने काही वाहनचालक नितीन कंपनीहून हरी निवास, नौपाडा, कोपरी याअंतर्गत मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे या मार्गावरही काही काळ वाहतुकीचा भार वाढला होता. दुपारी २ नंतरही तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहतूककोंडी कायम होती. त्यामुळे वाहनचालकांना १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही.

आणखी काही दिवस वाहतूककोंडीचे  एमएमआरडीएकडून सुरू असलेले दुरुस्तीचे काम २३ मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागणार आहे.