ठाणे : मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला व तिच्या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उशिरा उघडकीस आली. सानिया बानू व त्यांचा एक वर्षाचा मुलगा शाहजेब अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात २९ ऑगस्टला झाला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अवजड वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते भिवंडी येथील रहिवासी होते. ईदनिमित्त २५ ऑगस्टला सानीया या मुलगा शाहजेब आणि सौजाद यांच्यासोबत मुंब्रा येथील माहेरी आल्या होत्या. २९ ऑगस्टला सकाळी त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचे पती साजीद शाइन मुंब्रा येथे दुचाकीने आले होते. दुपारी सानीया, शाहजेब, साजिद व सौजाद हे चौघे दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने घरी परतत होते. त्यावेळी मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात त्यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांनाही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर अवजड वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी जखमी चौघांनाही उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सानिया व त्यांचा मुलगा शाहजेब यांचा मृत्यू झाला होता. साजीद शाईन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
