मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे चिपळूण, महाड येथे पाच हजार पुस्तकांची मदत

ठाणे : कोकणातील महाड आणि चिपळूण भागांत आलेल्या महापुरामुळे येथील अनेक ग्रंथालयांचे मोठे नुकसान झाले. हजारो पुस्तके पाण्यात वाहून गेल्याने या ग्रंथालयांना मदत करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने नागरिकांना पुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण अडीच हजार पुस्तके दान के ली आहेत, तर उर्वरित पुस्तके मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे देण्यात येणार आहे. सुमारे पाच हजार पुस्तके पूरग्रस्त भागातील ग्रंथालयांना पाठविण्यात येणार आहेत.

या पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासनातर्फे आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे  मागील अनेक दिवसांपासून कपडे, पाणी, पाकीटबंद खाद्यपदार्थ, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पाणी ओसरल्याने आणि शहरांमध्ये साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने तेथील नागरिकांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पुराच्या पाण्याचा फटका शहरातील अनेक ग्रंथालयांनाही बसला आहे. अनेक लहानमोठ्या ग्रंथालयांतील अमूल्य आणि दुर्मीळ अशी पुस्तके पाण्यात वाहून   गेली आहेत.

या ग्रंथालयांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे मागील पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्र्थ्यांयातील सर्व पुस्तकप्रेमी, वाचनालये, पुस्तकविके्रते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपर्यंत पुस्तक दान करण्याचे आवाहन मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंधरा दिवसांत ठाणे आणि आसपासच्या शहरांतील नागरिकांनी तब्बल अडीच हजार पुस्तके मराठी ग्रंथसंग्रहालयात जमा केली आहेत. नागरिकांनी दान केलेली अडीच हजार पुस्तके आणि मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे काही पुस्तके अशी सुमारे पाच हजार पुस्तके ग्रंथालयांना पाठविण्यात येणार आहेत. यासाठी चिपळूण आणि महाड येथील विविध ग्रंथालयांशी संपर्क साधला जात असून त्यांना त्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची पुस्तके पाठविण्यात येणार असल्याचे मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सांगण्यात आले.

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी करण्यात आलेल्या ग्रंथदानाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा पुस्तकदानाचा ओघ पाहता या ग्रंथदानाच्या मोहिमेचा कालावधी २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. या दरम्यान ज्या नागरिकांना पुस्तक दान करायचे असतील तर त्यांनी मराठी ग्रंथालयाशी संपर्क साधावा. – विद्याधर वालावालकर, अध्यक्ष, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे