आस्ट्रेलियातील प्रसिध्द कंपन्यांमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष पदाची भरती आहे असे सांगून तीन भामट्यांनी डोंबिवलीतील खोणी जवळील पलावा लेकसाईड वसाहती मधील एका नोकरदाराची आठ लाख ४१ हजार ६२४ रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिबाशिष प्रशांत मुखर्जी (४७, रा. लेकसाईड, लेकशोअर ग्रीन, खोणी, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. हिमांशु कदम, थॉमस जॉर्ज, डॅन विल्सन या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ मे २०२२ ते १४ जून २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शिबाशिष मुखर्जी यांना हिमांशु कदम, डॅन विल्सन, थॉमस जॉर्ज यांनी आपण ऑस्ट्रेलिया मधील वरले पॅरिसन या सल्लागार कंपनीतील प्रतिनिधी आहोत असे सांगितले. नोकर भरती विषयक मुलाखती, नियुक्त्या विषयक कामे आम्ही करतो असे भामट्यांनी शिबाशिष यांना सांगितले. ऑस्ट्रेलियातील ॲकॉम, ऑटॉन, एचसीसी कंपनीत साहाय्यक उपाध्यक्ष पदे रिक्त आहेत. या ठिकाणच्या भरती प्रक्रियेसाठी आम्ही मुलाखती इच्छुक, पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत. भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शिबाशिष यांनी भामट्यांना ऑनलाईन मुलाखत दिली. या मुलाखतीत पात्र ठरल्याने पद स्थापना होण्यापूर्वी वैद्यकीय सुरक्षा अनामत रक्कम, हमीपत्र, ना हरकत पत्र, वस्तू व सेवा कर अशा कामांसाठी भामट्यांनी टप्प्याने शिबाशिष यांच्याकडून ऑनलाईन व्यवहारातून आठ लाख ४१ हजार ६२४ रुपये वसूल केले.

पैसे भरणा केल्यानंतर शिबाशिष नियुक्ती पत्र देण्यासाठी भामट्यांकडे तगादा लावू लागले. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मे-जूनमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम होऊन तीन महिने उलटले तरी आपणास नियुक्ती पत्र मिळत नसल्याने शिबाशिष यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. त्यानंतर भामट्यांनी त्यांना प्रतिसाद देण्यास टाळाटाळ सुरू केली.

आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर शिबाशिष मुखर्जी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.