ठाणे : हिंद-दी-चादर गुरू तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात भाविकांनी राज्य आणि देशभरातून हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. तापमान वाढीमुळे भाविकांना थकवा आणि अस्वस्थता होण्याची शक्यता असताना, प्रशासनाच्या तांत्रिक उपाययोजना आणि व्यवस्थापनामुळे भाविकांना काहीसा दिलासा मिळाला.
कार्यक्रम स्थळी आठ फॉगर गाड्या तैनात करण्यात आल्या असून, त्यांच्याद्वारे हवेत सातत्याने उच्च दाबाने पाणी फवारून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, या गाड्यांमध्ये प्रत्येक गाडी १००० लिटर क्षमतेचे पाणी वापरते आणि सुमारे ५० मीटर परिसरात थंडावा पसरवते. उष्णतेच्या तीव्रतेमध्येही या यंत्रणेमुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहिल्याने, भाविक अधिक आरामात आणि उत्साहाने कार्यक्रमाचा अनुभव घेत आहेत.
याशिवाय, प्रशासनातर्फे भाविकांच्या आरामसाठी शेड्स, पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वितरण, तात्पुरते विश्रांती क्षेत्रे, प्राथमिक उपचार केंद्रे आणि आरोग्य तपासणी बूथ तयार करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेतून १५०, नवी मुंबई महानगरपालिकेतून १२० आणि मुंबई महानगरपालिकेतून १७५ स्वच्छता कर्मचारी या कार्यक्रमासाठी तैनात आहेत. ; हे कर्मचारी कचरापेट्या नियमितपणे रिकाम्या करत, परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि भाविकांना मार्गदर्शन करण्यास सातत्याने सक्रिय असल्याने परिसरात स्वच्छतेमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासन आणि शीख बांधवांकडून स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी कचरा संकलनासाठी ५० पेक्षा जास्त कचरापेट्या, प्लास्टिक आणि जैविक कचरा वेगळा करण्यासाठी विशेष विभाग आणि स्वच्छता कर्मचारी तात्काळ कचरा साफ करण्यासाठी तैनात आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा विस्तृत स्वच्छता आणि उकाडा प्रतिबंधक उपाययोजनांमुळे परिसरात सातत्यपूर्ण शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. फॉगर यंत्रणेमुळे थंडावा टिकून राहिला तर वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेल्या विश्रांती क्षेत्रांमुळे भाविकांना आरामाची संधी मिळाली. पाण्याचे वितरण आणि प्राथमिक उपचार बूथ कार्यरत असल्याने गरमी किंवा थकव्यामुळे होणाऱ्या असुविधा तातडीने दूर करण्यास मदत झाली.
स्वच्छता कर्मचारी नियमितपणे मार्गदर्शन करत असून, परिसरातील कचरा वेळेत संकलित केला जात आहे. प्लास्टिक व जैविक कचऱ्याचे वेगळे वर्गीकरण करून परिसरात दुर्गंधीमुक्त वातावरण राखण्याचे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत. या सर्व नियोजनामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी केवळ सुरक्षा आणि आरोग्याचाच नव्हे तर भाविकांना उत्साहाने आणि स्वच्छ वातावरणात समारंभ अनुभवता येत आहे. कार्यक्रमाची गती आणि शिस्त अशा व्यवस्थेमुळे सुरळीत राहिली असून, जल ३५० व्या शहिदी समागमाचा महोत्सव यशस्वी आणि सुनियोजित स्वरूपात पार पडत असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे.
